Mumbai ED Office Fire News: दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील बलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. सक्तवसुली संचालनालयाचे कार्यालय या इमारतीत आहे. आग विझवण्याचे काम मुंबई अग्निशमन दलाकडून सकाळी सुरु झाले.

फोर्ट परिसरात बेलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या या इमारतीत शनिवारी मध्यरात्री २ वाजल्यानंतर ही आग लागली. आग लागल्यावर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीचे गांभीर्य वाढल्यामुळे आग दोन आणि तीन स्तराची असल्याचे घोषित करण्यात आले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी ८ अग्निशमन इंजिन, ६ जंबो टँकर, १ एरियल वॉटर टॉवर टेंडर, १ ब्रीदिंग अॅपरेटस व्हॅन,१ वॉटर क्विक रिस्पॉन्स वाहन आणि १०८ रुग्णवाहिका असा मोठा ताफा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीचे कार्यालय असलेल्या इमारतीला आग

बेलार्ड पिअर येथील ही इमारत तळमजला अधिक चार मजले अशा स्वरुपाची आहे. त्यापैकी चौथ्या मजल्यावर सक्तवसुली संचालनालयाचे कार्यालय आहे. या कार्यालयातच ही आग लागली होती. रविवारी दुपारी बारानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचा मोठा ताफा दाखल होता. अग्निशमन दलाचे प्रमुख रविंद्र आंबुलगेकर हे देखील घटनास्थळी दाखल होते. शनिवार, रविवार असल्यामुळे इमारतीतील सगळी कार्यालये बंद होती. त्यामुळे आग आतल्याआत पसरली होती. लाकडी सामान, कागदपत्रे, फायली जळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. त्यामुळे अग्निशमन जवानांना आत प्रवेश करता येत नव्हता. त्यामुळे आगीचा ३ क्रमांकाचा स्तर घोषित करण्यात आला होता. काचा फोडून धूर बाहेर काढण्यात आला. तसेच दरवाजाचे कुलुप तोडून अग्निशमन दलाच्या जवानांनी आत प्रवेश केला व सकाळी साडे अकराच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीमध्ये खूप सामान, कागदपत्रे जळाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोमवारी अग्निशमन दलाच्या परवानगीनंतरच कार्यालयात अधिकाऱ्यांना प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे किती नुकसान झाले, आग कशामुळे लागली याबाबी त्यानंतरच पुढे येऊ शकणार आहेत.