मुंबई : जोगेश्वरी येथे निघालेल्या कावड यात्रेवर अज्ञात व्यक्तींनी अंडी फेकल्याचा प्रकार घडला. यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.
जोगेश्वरीत विश्व हिंदू परिषद आणि श्री खांडेश्वर महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक समतरसता नावाने कावड यात्रा काढण्यात आली होती. जोगेश्वरी पश्चिमेच्या यादव नगर येथील हनुमान मंदिरापासून सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही यात्रा सुरू झाली होती. त्यात सुमारे पाचशे भाविक सहभागी झाले होते. त्यात महिला देखील होत्या. या कावड यात्रेचा समारोप खांडेश्वर मंदिरात होणार होता. यात्रा दुपारी २ च्या सुमारास जोेगेश्वरी येथील कॅप्टन सामंत मार्गावरी एआरबी हाईटस या इमारती समोरून जात असताना अचानक यात्रेतील महिलांवर अंडे फेकण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली.
मी वाहतूकीस अडथळा येऊ नये यासाठी नियोजन करत होतो. त्यावेळी महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एका महिलेच्या पायाजवळ अंडे पडले, तर दुसरे अंडे चारचाकी वाहनावर पडले, असे आयोजक गोविंद बेनवंशी यांनी सांगितले. येथील इमारतीवरूनच अंडी फेकण्यात आल्याचा दाट संशय आहे. इमारतीमधील काही महिलांना आमच्यातील काही लोकांनी पाहिले होते. मात्र यात्रेला बाधा येऊ नये यासाठी आम्ही शांततापूर्वक कावड यात्रा सुरू ठेवली, असेही ते म्हणाले. यंदा आमचे यात्रेचे दुसरे वर्ष आहे. पंरतु याच वर्षी असा प्रकार घडला, असे एका आयोजकाने सांगितले. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात धार्मिक भावना भडकविल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अंबोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जबाब नोंदविले आहेत.
भाविकांमध्ये संताप
आम्ही शांततापूर्वक कावड यात्रा काढतो. परंतु हेतुरस्सर असे प्रकार केले जात आहेत. संबंधितांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे.
अंडे फेकण्याची दुसरी घटना
एप्रिल महिन्यात विरारमध्ये रामनवमी निमित्ताने सकल हिंदू समाजातर्फे शोभायात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा चिखलडोंगरी परिसरातून जात असताना यात्रेवर अंडी फेकण्यात आली होती. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता.
काय आहे कावड यात्रा?
उत्तर भारतात प्रामुख्याने श्रावण महिन्यात (जुलै-ऑगस्ट दरम्यान) कावड यात्रा काढण्यात येते. या यात्रेलील सहभागी भाविक ‘कावडिया’ म्हणून ओळखले जातात. या यात्रेच्या माध्यमातून शंकराला गंगाजल अर्पण करण्यासाठी भाविक चालत जातात.