मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकीच्या प्रवेश फेरीत केलेल्या बदलानुसार दुसऱ्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीपैकी महाविद्यालय मिळाले असेल, त्यांचा प्रवेश आपोआप निश्चित होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा. अन्यथा हे विद्यार्थी पुढील फेरीतून बाद होतील. त्यामुळे प्राधान्यक्रमातील पहिल्या तीन महाविद्यालयांमधील महाविद्यालय मिळाले असल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) करण्यात आले आहे.
सीईटी कक्षामार्फत अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी जाहीर करण्यात आली असून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीत तब्बल १ लाख ६२ हजार २०५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर एमबीएसाठी २१ हजार ५१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. बदललेल्या प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये यासाठी दुसऱ्या फेरीत पसंतीक्रमातील पहिल्या तीन महाविद्यालयांपैकी महाविद्यालय मिळाले असल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. प्रवेश न घेतल्यास त्या विद्यार्थ्याला पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही, असे कक्षाने सांगितले आहे.
तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून त्या फेरीत उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल. मात्र, नियमांनुसार तिसऱ्या फेरीत पहिल्या सहा महाविद्यालयांपैकी महाविद्यालय मिळाले असल्यास तेथेही प्रवेश आपोआप निश्चित होतील. चौथी फेरी अंतिम असून, त्यानंतर कोणतीही सुधारणा किंवा फेरबदलाची संधी दिली जाणार नाही. त्यामुळे आता पसंतीक्रम भरताना आणि पर्याय निश्चित करताना नियम काळजीपूर्वक वाचावेत. अनेक विद्यार्थी पर्याय भरताना निष्काळजीपणा केल्यास अपेक्षित महाविद्यालय किंवा अभ्यासक्रम मिळणार नाही.
सध्याच्या स्थितीत अभियांत्रिकी आणि एमबीए दोन्ही प्रवेश प्रक्रियेत काही हजार जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे ज्यांना यावेळी प्रवेश मिळालेला नाही, त्यांच्यासाठी अजून संधी उपलब्ध आहे. परंतु, ज्यांना पहिल्या तीन पसंतींपैकी किंवा संबंधित नियमांनुसार जागा मिळाली आहे, त्यांनी विलंब न करता महाविद्यालयात जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी. वेळेत प्रवेश न घेतल्यास त्यांचा दावा रद्द होऊन जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध होणार आहे.