मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षातील आणखी एका माजी नगरसेविकेने शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत कुलाबा येथील प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झालेल्या माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचाही पक्षप्रवेश झाला.
मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून मुंबईतील माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर होणारी ही निवडणूक खूप महत्त्वाची समजली जात आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतून एक एक नगरसेवक बाहेर पडत असून ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. हा ओघ सतत सुरू असून शुक्रवारी सुजाता सानप यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. सानप यांचे दीर गणेश सानप हे देखील माजी नगरसेवक होते व कुलाबा विधानसभा संघटक पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनीही यावेळी पक्षप्रवेश केला. सुजाता सानप या स्थायी समिती सदस्या होत्या. तर गणेश सानप हे मागील कार्यकाळात बेस्ट समिती सदस्य होते.
मुक्तागिरी निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशीरा हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळेंसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येवला येथील माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह डॉ. सुधीर जाधव, उत्तमराव आहेर, अजय जैन, दयानंद जावळे, नगरसेवक अंबादास कस्तुरे यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अडीच वर्ष सरकारने जे काम केले ते जनतेने पाहिले. शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहे. त्यामुळे राज्यातून आणि राज्याच्या बाहेरुनही राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर काहीजण म्हणाले होते तुमच्यासोबत गेलेला एकही आमदार निवडून येणार नाही, पण विधानसभा निवडणुकीत ५० चे ६० आमदार झाले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला. धनुष्यबाण आणि शिवसेना गहाण टाकण्याचे काम तुम्ही केले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेवर (ठाकरे) केली. राज्यातील जनतेने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचीच खरी शिवसेना आहे यावर शिक्कामोर्तब केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
६५ नगरसेवक आल्याचा दावा
माजी नगरसेविका सुजाता सानप आणि गणेश सानप यांनी सुचवलेली विकास कामे पूर्ण करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेतील उबाठाचे जवळपास ६५ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मिळून मोठी फौज शिवसेनेत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजना सुरू राहणार
विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने दिली होती, ती टप्प्याटप्याने पूर्ण करणार, असेही शिंदे यावेळी म्हणाले. तसेच विरोधी पक्षाने कितीही टीका केली तरी लाडकी बहिणी योजना, शेतकऱ्यांशी संबधित योजना बंद होणार नाहीत, असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला.