मुंबई : पुढील काही दिवसांमध्ये उत्सवांची धामधूम सुरू होत आहे. स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव व नवरात्रौत्सव या कालावधीत विविध मंडळे, धार्मिक संघटना व राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.

मात्र या कालावधीत संकलित करण्यात येणाऱ्या रक्तापैकी काही रक्त वाया जाते. याचा फटका भविष्यातील रक्त संकलनावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्सवकाळात अतिरिक्त रक्त संकलन होणार नाही याची काळजी घेऊन आयोजकांनी रक्ताच्या तुटवड्याच्या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास विनंती करावी, अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना केले आहे.

स्वातंत्रदिन, गणेशोत्सव व नवरात्रौत्सव या कालावधीत अनेक मंडळे, राजकीय नेते, धार्मिक संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्त संकलित केले जाते. मात्र दरवर्षी दिवाळीमध्ये अनेक दाते पर्यटनासाठी बाहेरगावी जात असून दरवर्षी या कालावधीत रक्ताचा तुटवडा जाणवतो. संकलित केलेले रक्त आणि त्यावर प्रक्रिया करून विलग केलेल्या लाल पेशी यांची जीवन मर्यादा ३५ दिवसांची असते. त्यानंतर हे रक्त व लाल पेशी वापरण्यासाठी अयोग्य ठरतात. त्यामुळे त्यांचा वापर वेळेत होणे आवश्यक असतो.

परिणामी, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये संकलित केलेले रक्त दिवाळीपर्यंत वापरण्यायोग्य राहत नाही. तसेच व्यक्तीला तीन महिन्यांनी रक्तदान करता येते. त्यातच रक्तदान करणाऱ्या व्यक्ती या ठरावीकच असल्याने त्यांनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये रक्तदान केल्यास ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये त्यांना रक्तदान करता येत नाही. परिणामी या कालावधीत रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे उत्सवकाळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबाबत राज्य रक्त संक्रमण परिषदेने मार्गदर्शक सूचना जाहीर करून काही प्रमाणात चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यानुसार ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांतील मागील तीन वर्षांची रक्ताची सरासरी मागणी लक्षात घेऊन त्यानुसारच रक्त संकलन करावे. तसेच या कालावधीत कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त रक्त संकलन होणार नाही व रक्त मुदतबाह्य होऊन ते वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना रक्तपेढ्यांना दिल्याची माहिती सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी दिली.

रक्त तुटवड्याच्या कालावधीत शिबिरांचे आयोजन करा

ठरावीक रक्तदाते आणि रक्ताचे आयुष्य ३५ दिवसांचे असल्याने आयोजकांनी उत्सव कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याऐवजी रक्ताचा तुटवडा निर्माण होणाऱ्या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, अशी विनंती रक्तपेढ्यांनी करावी. तसेच याबाबत आयोजकांचे योग्य ते समुपदेशन करण्याची सूचनाही परिषदेने रक्तपेढ्यांना केली आहे.