मुंबई : मुंबईत सातत्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून उंच इमारतींमध्ये लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आगीच्या दुर्घटनांमध्ये उंच इमारतींमधील मदतकार्य काही प्रमाणात सुलभ व्हावे, यासाठी अग्निशमन दलाने ६८ मीटर उंचीच्या शिडीची (टर्नटेबल लॅडर) चार वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ही वाहने अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाल्यांनतर मुंबई अग्निशमन दल अधिक सक्षम होईल. मात्र, ही वाहने निविदा प्रक्रियेत अडकली असून अग्निशमन दलाला या वाहनांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात विकासकामांवर भर दिला जात असून सद्यस्थितीत गगनचुंबी इमारतीची अनेक कामे सुरू आहेत. तसेच, शहरात ६० मजल्यांपेक्षाही जास्त उंचीच्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये आग लागल्यास अग्निशमन दलाच्या जवानांना जीवाची पर्वा न करता बचावकार्य करावे लागते. अनेकदा या इमारतींमधील मदतकार्यादरम्यान, अग्निशामकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, वेळेत मदतकार्य न पोहोचल्यास जीवितहानी होण्याचा धोका संभवतो.
मुंबईत सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलावर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे गगनचुंबी इमारतीतील मदतकार्य काही प्रमाणात सुलभ व्हावे, यासाठी अग्निशमन दलाने ६८ मीटर उंचीच्या शिडीची (टर्नटेबल लॅडर) खरेदी करण्याचे ठरविले होते. सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडे ४० मीटर उंचीचे एक, ३० मीटर उंचीची दोन, ६४ मीटर उंचीची दोन, ३७ मीटर उंचीची दोन आणि ५५ मीटर उंचीचे एक अशी एकूण आठ उंच शिडी वाहने आहेत. त्यात आता ६८ मीटर उंचीच्या चार वाहनांची भर पडणार आहे.
याबाबत अग्निशमन दलाने निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रियेत अडकलेल्या या शिडी वाहनात उदवाहनाचीही सोय आहे. त्यामुळे बचावकार्य वेगाने होऊ शकणार आहे. मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने अग्निशमन दल, तसेच मुंबईकरांना या वाहनांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई अग्निशमन दलाने आवश्यक सर्व कागदपत्रे आणि कारणमीमांसा सादर केल्यानंतरही निविदा रखडलेली आहे. वाहने पुरवणाऱ्या दोन प्रतिस्पर्धी उत्पादकांमध्ये कंत्राट मिळवण्याची स्पर्धा सुरू असल्यामुळे ही शिडी वाहने खरेदी रखडल्याची चर्चा आहे. ही विशेष वाहने तयार करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. ही निविदा रद्द झाल्यास पुन्हा नव्याने निविदा मागवण्याची वेळ अग्निशमन दलावर येण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये अग्निसुरक्षेसंदर्भातील उपकरणांच्या किंमती सातत्याने वाढत असून अधिक विलंब झाल्यास महानगरपालिकेला या वाहनांची खरेदी खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.