मुंबई : झाडावर, इमारतींच्या कोनाड्यात, अडगळीत, विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्षी आणि प्राण्यांच्या बचावासाठी दरवर्षी मुंबई अग्निशमन दलाकडे सुमारे पाच हजार तक्रारी येतात. अशा प्रसंगात प्राणी – पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी अग्निशमन दल आता अत्याधुनिक पोल्स खरेदी करणार आहे. हे पोल्स तब्बल ४४ फूट उंच करता येणार आहेत.

मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्या, अरुंद रस्ते व गल्ल्या, वाहतूक कोंडीचे मार्ग आदी ठिकाणी अपघात होत असतात, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, अशा वेळी मुंबईकर मदतीसाठी अग्निशमन दलाशी संपर्क साधून तक्रार करतात. दरवर्षी मुंबई अग्निशमन दलाकडे तब्बल १५ हजार आपत्कालीन दुर्घटनांच्या तक्रारी अर्थात वर्दी येतात. अग्निशमन दलाकडून या तक्रारी, वर्दींची दखल घेतली जाते. त्यात आग लागणे, अपघात, झाड पडणे, बुडणे, रसायनांची गळती, रस्त्यावर तेल सांडणे, घर कोसळणे, इमारत पडणे अशा अनेक दुर्घटनांचा समावेश असतो.

या दुर्घटनांच्या वर्दीमध्ये जवळपास पाच हजार वर्दी या अडकलेल्या प्राणी व पक्ष्यांच्या बचावासाठी असतात. अशा घटनांमध्ये प्राणी व पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरील एखादी वस्तू अथवा बांबूचा वापर करून पक्षी किंवा प्राण्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालून झाडांवर, विजेच्या तारांमध्ये उंचीवर अडकलेल्या पक्षी व प्राण्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे लागतात. २०१८ मध्ये मुंबई अग्निशमन दलाने घेतलेले बर्ड रेस्क्यू टेलिस्कोपिक रॉड निकामी झाले असून काही नादुरुस्त स्थितीत आहेत. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाने नवीन पद्धतीचे रॉड खरेदी करण्याचे ठरवले आहे. कार्बन फायबरपासून बनवलेले, वजनाने हलके ४४ फुटापर्यंत पोहोचणारे टेलिस्कोपिक पोल उपकरण खरेदी करण्यात येणार आहे. अग्निशमन दलासाठी ५७ पोल खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी सर्व करांसह सव्वादोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्ष्याला वाचवताना जवानाचा मृत्यू

मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ २०१७ मध्ये अडकेल्या पक्ष्याचा बचाव करताना रेल्वेच्या विद्युत तारेचा धक्का लागून एका अग्निशमन जवानाला प्राण गमवावे लागले होते. त्यापूर्वीही कावळ्याला वाचवताना अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने टेलिस्कॉपिक पद्धतीने बंद होणारे, कमी वजनाचे, १६ फूट उंचीपर्यंत पोहोचणारे बर्ड रेस्क्यू टेलिस्कोपिक रॉड २०१८ मध्ये खरेदी केले होते. मुंबई अग्निशमन दलाची मागणी लक्षात घेऊन ३५ अग्निशमन केंद्रांसाठी ते खरेदी करण्यात आले होते.