fire in a 24 story building in Dahisar : दहिसर येथील एस. व्ही. रोडजवळील न्यू जनकल्याण सोसायटीत रविवारी भीषण आग लागोल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा मंगळवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. या दुर्घटनेत ५४ जण जखमी झाले होते. त्यापैकी २१ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दहिसरमधील एस. व्ही. रोडजवळील शांती नगरातील २३ मजली न्यू जनकल्याण सोसायटीच्या सातव्या मजल्यावर रविवारी दुपारी अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या आणि अन्य वाहने आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामकांना आग विझवण्यात अडचणींचा सामना करावा लागला होता. विजेच्या तारांच्या संपर्कात आलेल्या आगीने क्षणातच अक्राळविक्राळ रुप धारण केले होते. तसेच, इमारतीच्या तळघरातील दोन मीटर बॉक्सही आगीच्या संपर्कात आले होते.

तळमजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. आगीमुळे इमारतीत ३६ रहिवासी अडकले होते. अग्निशामकांनी या रहिवाशांची सुटका केली. या दुर्घटनेत ५४ जण जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. अन्य जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते.

शताब्दी रुग्णालयात दाखल असलेल्या मधू विनोद पटेल (४०) यांचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली असून अन्य २१ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून अन्य २० जणांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच, ३१ जखमींना उपचार केल्यानंतर घरी पाठविण्यात आले.