अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या ५८ वर्षीय परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ८७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. या कोकेनची किंमत १३ कोटी रुपये आहे. याप्रकरणी आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
रेमंड अनाने कायरेमाटेंग (५८) असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो घाना देशाचा नागरिक आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ८७ कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन १३०२ ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे १३ कोटी रुपये आहे. चौकशीत त्याला मुख्य आरोपीने कोकेन व विमानाचे तिकीट दिले होते. ते मुंबईत वाहून आणण्यासाठी पैसे देण्याचे कबुल केले होते. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिला होता. त्याला शुक्रवारी याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने त्याला अटक केली. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai foreign national arrested with cocaine worth thirteen crores mumbai print news amy
First published on: 03-09-2022 at 20:51 IST