मुंबई : ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक आणि ध्वजपथकांची लगबग, लक्षवेधी चित्ररथ आणि पारंपरिक पेहरावातील तरुणाईचा उत्साह गर्दी यंदाही गुढीपाडव्यानिमित्त मंगळवार, ९ एप्रिल रोजी आयोजित मुंबईतील स्वागतयात्रांमध्ये पाहायला मिळेल. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला पूर्ण झालेली ३५० वर्षे, या दोन्ही घटनांची छाप मुंबईतील स्वागतयात्रांवर असेल.

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गिरगावमधील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची हिंदू नववर्ष स्वागतयात्रा म्हणजेच प्रसिद्ध ‘गिरगावचा पाडवा’ हा यंदा ‘शिवराज्य हेच रामराज्य’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे. गिरगावातील फडके श्री गणपती मंदिरापासून गुढी पुजनाने सकाळी ८ वाजता या स्वागतयात्रेला सुरुवात होईल. मूर्तिकार योगेश इस्वलकर यांनी साकारलेल्या २२ फूट उंच महारूद्र हनुमंताच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असेल, मूर्तिकार प्रदीप मादुस्कर यांनी साकारलेली गणेश मूर्ती यात्रेच्या अग्रस्थानी असेल, श्री रामाचे दर्शन देणारा, तसेच छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचे स्मरण करणारा ‘शिवराज्य हेच रामराज्य’ या संकल्पनेवरील आधारित चित्ररथ हे या स्वागतयात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच मूर्तिकार संतोष कांबळी यांनी साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा देखावा आणि कलादिग्दर्शक तुषार कोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित साकारलेला देखावाही असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पेहरावातील दुचाकीस्वार युवतींचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, गिरगांव कला मंचतर्फे संस्कारभारती रांगोळ्या तसेच रंगशारदातर्फे स्वागतयात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या आणि शेवटी यात्रेदरम्यानचा कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक ही स्वागतयात्रेची मुख्य वैशिष्ट्ये असणार आहेत. तसेच तरुण, तरुणींची व लहान मुलांची प्राचीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, श्री समर्थ व्यायाम मंदिरतर्फे मल्लखांब व रोप मल्लखांब यांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. ‘चैत्र स्वागत’ हा नववर्ष स्वागत विशेषांक यावर्षी सुद्धा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केला जाणार आहे.

हेही वाचा : महारेराचा प्रस्ताव मंजुरीतील वेग वाढला! मार्चअखेरपर्यंत ५४७१ पैकी ४३३२ प्रकल्प मंजूर!

२० फूट उंच मूर्ती

गिरगावमधील शिवसेवा प्रतिष्ठानची हिंदू नववर्ष स्वागतयात्रा यंदा ‘अखंड भारत’ या संकल्पनेवर आधारित आहे. सकाळी ८ वाजता गिरगाव नाक्यावर गुढी पुजनानंतर स्वागतयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर स्वागतयात्रा जे.एस.एस. मार्ग व ठाकूरद्वार येथून मार्गस्थ होऊन दुपारी २ वाजता समाप्त होईल. २० फूट उंच तिरुपती बालाजीची भव्य मूर्ती यंदाच्या स्वागतयात्रेचे वैशिष्ट्य असणार आहे. तसेच गिरगावच्या महाराजाची सुबक मूर्ती, भारतातील विविध मंदिरांचे चित्ररथ, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडींचा वेध घेणारे चित्ररथ, राज्यातील आरक्षण आंदोलनाचे चित्ररथ, सामाजिक प्रबोधन करणारे चित्ररथही या स्वागतयात्रेत असणार आहेत. तसेच ४०० जणांचा समावेश असलेले जगदंब ढोल – ताशा पथक, महिलांचे ध्वज पथक व दुचाकी फेरी, महाराष्ट्रातील पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके सादर होणार असून मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारही हजेरी लावणार आहेत.

वरळी, परळमध्ये मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

वरळीतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे जांबोरी मैदान ते संपूर्ण डॉ. जी. एम. भोसले मार्गावर सकाळी ८ ते ११.३० या वेळेत गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. ‘आम्ही वरळीकर’ या संकल्पनेतून गेल्या १४ वर्षांपासून ही स्वागतयात्रा आयोजित केली जात असून यंदा ‘रामराज्य रथ’ हे स्वागतयात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिकेही सादर केली जाणार आहेत. १०० महिलांचा सहभाग असलेले लेझीम पथक, पारंपरिक मंगळागौर, विठूनामाचा गजर करीत वारकऱ्यांचा सहभाग असलेली ‘वारी’, साईबाबांची पालखी आणि वरळीतील दि. एन.एस. डी.अंध उद्याोग गृहातील विद्यार्थ्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन केले जाणार आहे. लोअर परळमधील मानाजी राजुजी चाळ व आसपासच्या इमारतींतर्फेही स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. ढोल – ताशांच्या गजरात सकाळी ८ वाजता ही स्वागतयात्रा मानाजी राजुजी चाळ येथून निघणार असून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन या स्वागतयात्रेतून घडणार आहे.

हेही वाचा : ‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात

‘खेळाडू पार्लेकर, राष्ट्राभिमानी पार्लेकर’ या संकल्पनेवर स्फूर्तीयात्रा

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे रौप्य महोत्सवी वर्ष, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विलेपार्ले येथील हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रा ही यंदा ‘खेळाडू पार्लेकर, राष्ट्राभिमानी पार्लेकर’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे. या स्फूर्तीयात्रेत विलेपार्लेतील ५० ते ६० स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. विलेपार्लेच्या उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि मध्य या पाच दिशांतून पाच यात्रा निघणार असून पार्लेश्वर मंदिर चौकात त्या एकत्र येणार आहेत. त्यानंतर पुढे या पाच यात्रांची महास्फूर्तीयात्रा होणार असून हनुमान रस्त्यावरुन मार्गक्रमण करून गणेश चौक येथे या स्फूर्तीयात्रेचा समारोप होईल. ही स्वागतयात्रा सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत निघणार आहे. या स्फूर्तीयात्रेमध्ये देशी खेळ, विदेशी खेळ, विस्मृतीत गेलेले खेळ आणि गंमतीचे खेळ, सांस्कृतिक व वैदिक खेळ, शरीर स्वास्थवर्धक खेळ, शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. तसेच ‘रामराज्य व शिवराज्य’ यांचे देखावे या स्फूर्तीयात्रेचे वैशिष्ट्य असणार आहे.

हेही वाचा : भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध तपासणी ठप्प; एफडीएमधील ८० टक्के अधिकारी, कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर

शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके

गोरेगाव पूर्वेकडील हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या स्वागतयात्रेचे यंदा २१ वे वर्ष आहे. भारतमातेची पालखी, भजनी मंडळ, ढोल – ताशा पथक, झांज व लेझीम पथक आणि ध्वज पथक ही या स्वागतयात्रेची वैशिष्ट्ये आहेत. गोरेगाव पूर्वेकडील दुर्गामाता मंदिरापासून सकाळी ८ वाजता या स्वागतयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर गोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात ही स्वागतयात्रा फिरून पुढे जयप्रकाश नगरमधील अनुभूती चौकात समाप्त होईल. यात्रेच्या समारोपावेळी शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके व विविध पथकांकडून प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. तसेच महापुरुषांच्या वेशभूषेत लहान मुले सहभागी होणार आहेत. गोरेगाव पूर्वेकडील ३० ते ३५ संस्थांचा या स्वागतयात्रेत सहभाग असणार आहे.