आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ईडीने उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितली. त्यानुसार कोर्टाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्च पर्यंत वेळ देऊन याचिका स्थगित केली आहे.
अटक करण्यामागे राजकीय हेतू असून ती बेकायदा ठरवण्याच्या मागणीसाठी मलिक यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष न्यायालयाच्या ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्याच्या आदेशालाही मलिक यांनी आव्हान दिले होते. याशिवाय ईडीने या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची, आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने सुटका करण्याची मागणी मलिक यांनी याचिकेद्वारे केली होती.
परंतु कोर्टाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत वेळ देत मलिकांची याचिका स्थगित केली आहे.