मुंबई : दाऊदी बोहरा समाजाचा नेता म्हणून सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या पदाला आणि नियुक्तीला आव्हान देणाऱ्या २०१४ च्या दाव्यावर उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. विशेष म्हणजे आठ वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर गेल्या वर्षी ५ एप्रिल रोजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या एकलपीठाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता.

न्यायमूर्ती पटेल हे येत्या २५ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या आधी ते या बहुप्रतीक्षित प्रकरणाचा निवाडा देणार आहेत. परंतु, निकाल राखून ठेवल्यानंतर वर्षभरानंतर तो देण्यात येणार असल्याने सध्या त्याबाबत न्यायालयीन वर्तुळात चर्चा आहे. वास्तविक, युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल किती काळात द्यावा याची मुदत ठरवून दिलेली नाही. परंतु, कायद्यात असे नमूद नसले तरीही, सर्वोच्च न्यायालयाने अनिल राय विरुद्ध बिहार राज्य प्रकरणात याबाबत स्पष्टोक्ती केली आहे. त्यानुसार, निर्णय राखीव ठेवल्यापासून तीन महिन्यांच्या आत दिला गेला नाही तर पक्षकार लवकर निकालासाठी अर्ज दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे, निर्णय राखीव ठेवल्यानंतर सहा महिन्यांहून अधिक काळ दिला गेला नाही, तर पक्षकार प्रकरण अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची आणि नव्याने सुनावणी घेण्याची मागणी करू शकतात. सय्यदना प्रकरणात मात्र पक्षकारांनी अशी मागणी केलेली नाही.

हेही वाचा : १४०० कोटींचे कंत्राट प्रकरण: महापालिकेकडून सरकारी धोरणाचे उल्लंघन केले जात असल्यास काय करणार? उच्च न्यायालयाची विचारणा

दरम्यान, जानेवारी २०१४ मध्ये खुझैमा कुतुबुद्दीन यांनी त्यांचे भाऊ आणि तत्कालीन सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे १०२ व्या वर्षी निधन झाल्यानंतर दावा दाखल केला होता. बुरहानुद्दीन यांचा दुसरा मुलगा मुफद्दल सैफुद्दीन याने सय्यदना म्हणून पदभार स्वीकारल्याला कुतुबुद्दीन यांनी सुरुवातीला आव्हान दिले होते. तसेच सैफुद्दीन यांना सय्यदना म्हणून कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपला भाऊ बुरहानुद्दीन यांनी आपल्याला ‘माझून’ (त्यांच्यानंतरचा उत्तराधिकारी) म्हणून नियुक्त केले होते आणि १० डिसेंबर १९६५ रोजी माझूनच्या घोषणेपूर्वी गुप्त ‘नास’द्वारे (वारसाहक्क प्रदान) खासगीरित्या त्याचा उत्तराधिकारी म्हणून अभिषेक केला होता, असा दावाही कुतुबुद्दीन यांनी केला होता. तथापि, २०१६ मध्ये कुतुबुद्दीन यांचे निधन झाले, त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांचा मुलगा ताहेर फखरुद्दीन यांना दाव्यात फिर्यादी म्हणून त्यांची जागा घेण्याची परवानगी दिली. फखरुद्दीन यांच्या दाव्यानुसार, मृत्यूपूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांना या पदासाठी नियुक्त केले होते.

हेही वाचा : मुंबई विमानतळावरून ५ कोटी प्रवाशांचा प्रवास

दाऊदी बोहरा शिया मुस्लिमांमधील एक धार्मिक संप्रदाय आहे. पारंपरिकपणे व्यापारी आणि उद्योजकांचा समुदाय अशी त्यांची ओळख आहे. त्याचे भारतात पाच, तर जगभरात दहा लाखांहून अधिक सदस्य आहेत. समाजातील सर्वोच्च धार्मिक नेता दाई-अल-मुतलक म्हणून ओळखला जातो.