मुंबई : सुमारे दीड लाखांहून अधिक गिरणी कामगारांपैकी फक्त २५ हजार गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळणार आहेत, ही वस्तुस्थिती असून खटाव गिरणीच्या बोरिवलीतील १३ एकर भूखंडावर आणखी किमान चार ते पाच हजार घरे मिळण्याची आशाही संपुष्टात आली आहे. आता फक्त अडीच एकर भूखंडावरच गिरणी कामगारांना हजार घरे मिळण्याची शक्यता असल्याचे शासनानेनच स्पष्ट केले आहे. एकट्या खटाव गिरणीच्या भायखळा व बोरिवली येथील युनिटमध्ये एकूण साडेचार हजार कामगार असून त्यापैकी फक्त हजार कामगारांनाच बोरिवलीत घरे मिळणार आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनीच ही बाब विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केली आहे.
खटाव गिरणीचे भायखळा आणि बोरिवली असे दोन युनिट असून भायखळा येथे विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे गिरणी कामगारांसाठी भूखंड दिला गेला नाही. मात्र बोरिवली येथे असेलल्या ४० एकर मोकळ्या भूखंडावर विकास नियंत्रण नियमावलीतील ५८ लागू असल्यामुळे एक तृतीयांश म्हणजे १३ एकर भूखंड मिळणे अपेक्षित होते. या दोन्ही युनिटमधील चार हजार ४०७ कामगार पात्र आहेत. बोरिवली येथील भूखंड खटाव गिरणी कामगारांना मिळावा म्हणून गेले पाच-सहा वर्षे गिरणी कामगार संघर्ष समितीमार्फत प्रयत्न सुरु होता.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणानेही गिरणी कामगारांच्या घरांसाठी भूखंड मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र विकासकांमध्ये न्यायालयीन वाद निर्माण झाल्यामुळे काहीही निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र गिरणी कामगारांच्या घरांसाठी भूखंड देण्याचे लेखी आश्वासन विकासकांनी दिले असल्याचे पत्र प्राधिकरणाने महापालिकेच्या मॅानिटरिंग कमिटीला फेब्रुवारी २०१७ मध्ये दिले होते. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. मात्र आता प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत हा संपूर्ण भूखंड खटाव गिरणी व्यवस्थापकाकडे सुपूर्द केला आहे. उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या ॲाक्टोबर २०२४ मधील पत्रानुसार, गिरणी कामगारांसाठी राखीव भूखंडाची प्रचलित बाजारमूल्याचा भरणा करून घेऊन विक्री केल्याची बाब उघड झाली आहे.
विकासकाने या भूखंडाच्या किमतीपोटी दीडशे कोटी रुपये जमा केले आहेत. हा भूखंड आता विकासकाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे, असा दावा गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांच्या उरल्यासुरल्सा आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विधीमंडळातील लेखी उत्तरामुळे गिरणी कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नांवर लेखी उत्तर देताना सामंत यांनी सांगितले की, १०,२२८.६९ चौरस मीटर भूखंडावर खटाव गिरणी कामगारांना ९०० ते हजार घरे मिळतील. याचा अर्थ गिरणी कामगारांच्या वाट्याला अडीच एकर भूखंड येण्याची शक्यता निर्माण झाल्याचा दावा घाग यांनी केला. मात्र बोरिवलीतील १३ एकर भूखंड हा गिरणी कामगारांच्या हक्काचा असून त्यासाठी आम्ही लढा देऊ, असेही घाग यांनी स्पष्ट केले.