मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील ५५६ विजेत्यांची उत्तुंग इमारतीतील ५०० चौ. फुटांच्या घरात राहण्यास जाण्याची प्रतीक्षा अखेर आता संपणार आहे. ५५६ घरांचा समावेश असलेल्या दोन इमारतींच्या निवासी दाखल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आता केवळ म्हाडा उपाध्यक्षांची स्वाक्षरी होणे शिल्लक आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत इमारतींना निवासी दाखला मिळणार असून घरांचा ताबा देण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच घरांचा ताबा देण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे. जुलैच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप होण्याची शक्यता आहे.
ब्रिटिशकालीन बीडीडी चाळींची पुरती दुरवस्था झाल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील बीडीडी चाळींचा पुनर्विकास मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. या तिन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यात काही पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. वरळीत ३३ पैकी १३ पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. या इमारती ४० मजली असून यातील घरे ५०० चौ.फुटांची आहेत. वरळीतील कामे सुरू असलेल्या १३ इमारतींपैकी ५५६ घरांचा समावेश असलेल्या दोन इमारतींच्या कामाला गती देऊन काही दिवसांपूर्वीच काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र पाणी, वीज जोडणी नसल्याने आणि काही कारणाने निवासी दाखला न मिळाल्याने या घरांचा ताबा रखडला होता. दरम्यान, या घरांच्या ताब्यासाठी मुंबई मंडळाकडून आतापर्यंत अनेक तारखा देण्यात आल्या. मात्र त्या सर्व तारखा चुकल्या. पण आता मात्र पाणी जोडणी, वीज जोडणी झाली असून अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या दोन इमारतींसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. निवासी दाखल्याच्या नस्तीवर म्हाडा प्राधिकरणाचे मुख्य अभियंता-२ यांंनी स्वाक्षरी केली. ही नस्ती शुक्रवारी म्हाडा उपाध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. त्यामुळे एक-दोन दिवसात निवासी दाखला मिळेल, असेही सूत्रांनी सांगितले.
निवासी दाखल अंतिम टप्प्यात असतानाच जुलैच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला जाण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र म्हाडाकडून अद्याप तारखेबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबत मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
या चाळीतील रहिवासी ५०० चौ. फुटांच्या घरात जाणार वरळीतील ५५६ घरांचा समावेश असलेल्या दोन इमारतीतील घरांसाठी मुंबई मंडळाकडून याआधीच सोडत काढण्यात आली आहे. त्यानुसार ४० मजली उत्तुंग इमारतीतील ५०० चौ. फुटाच्या घरांमध्ये रहावयास जाणारे पहिले ५५६ रहिवासी हे चाळ क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील असणार आहेत.