वांद्रे बँडस्टँडवर सेल्फी काढताना समुद्रात पडून एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून मुंबईतील १५ ठिकाणे ‘नो सेल्फी झोन’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याठिकाणी सेल्फी काढणे धोकादायक असल्यामुळे पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘नो सेल्फी झोन’च्या या यादीत मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी , वांद्रे बँडस्टँड, सायन फोर्ट, वरळी फोर्ट यांच्यासह मुंबईतील अन्य लोकप्रिय ठिकाणांचा समावेश असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेला दिली. याशिवाय, पोलिसांकडून अशा ठिकाणी सेल्फी काढताना होणारे अपघात टाळण्यासाठी पालिकेच्या स्थानिक प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. पालिकेकडून अशा ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्याची आणि धोक्याचे फलक लावण्याची शक्यताही धनंजय कुलकर्णी यांनी वर्तविली.
वांद्रे येथील बँडस्टँड येथे शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या तीन मैत्रिणी वांद्रे किल्ल्याच्या तटबंदीवर सेल्फी काढण्यासाठी उभ्या असताना त्यांचा तोल जाऊन त्या समुद्रात पडल्या. त्यांना वाचवायला पाण्यात उडी मारणाऱ्या एका बहाद्दराने दोघींना वाचवले खरे, मात्र तिसरीला वाचवण्याच्या प्रयत्नात तोही बुडाला. गेल्याच महिन्यात नाशिकमध्ये सेल्फी काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. याशिवाय, सप्टेंबर महिन्यात आग्रा येथील ताजमहालात सेल्फी काढताना पायऱ्यांवरून पडून एका जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
पोलिसांकडून मुंबईतील १५ ठिकाणे ‘नो सेल्फी झोन’ म्हणून घोषित!
याठिकाणी सेल्फी काढणे धोकादायक असल्यामुळे पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-01-2016 at 14:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai identifies no selfie zones after girl dies