मुंबई- परदेशी चलन व्यवहाराच्या (फॉरेक्स ट्रेडिंग) नावाखाली सुरू असलेले बनावट कॉल सेंटर गोरेगाव पोलिसांनी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कॉल सेंटर मधून फॉरेक्स ट्रेडींगची बनावट कंपनी उघडून गुंतवणूकदारांची कोटयवधी रुपयांची फसवणूक केली जात होती.

गोरेगाव पश्चिमेच्या राम मंदिर येथील अस्मी कॉम्प्लेक्स मधील एका कार्यालयात फॉरेक्स ट्रेडींग करणारे एक बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पोलिसांना अनेक लॅपटॉप, संगणक आणि अन्य डिजिटल साहित्य आढळले. फॉरेक्स ट्रेडींगमध्ये नफा मिळवून देतो असे सांगून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले जात होते आणि त्यांचे डिजिटल वॉलेट बंद करून गुंतवणूकदारांची फसणूक केली जात होती, असे पोलिसांनी सांगितले.

असे चालायचे कॉल सेंटर

डोंबिवलीत राहणारा रोहीत कदम उर्फ बॉस (३४) हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. रोहीत कदम याने अनिल गर (३५) यांच्या मदतीने हे बनावट फॉरेक्स ट्रेडींग संकेतस्थळ तयार केले होते. त्यांनी युनिटी एफएक्स लाईंव्ह नावाची कंपनी उघडण्यात आली होती. त्या नावाने संकेतस्थळ तयार केले होते. रोहीत कदम त्याच्या सहकाऱ्यांना गुंतवणूकदारांचे मोबाईल नंबर पुरवले होेते. आरोपी या गुंतवणूकदारांना संपर्क करायचे. नंतर त्यांच्या मोबाईल मध्ये लिंक पाठवून त्यांच्या मोबाईलचा बेकायदेशीर प्रवेश (ॲक्सेस) मिळवत होते. आरोपींकडे फॉरेक्स ट्रेडींग चालविण्याचा कुठलाही परवाना नव्हता.

शेकडो गुंतवणूदारांची फसवणूक

पोलिसांनी पंचासमक्ष छापा घातला तेव्हा कॉल सेंटर मधून फॉरेक्स ट्रेडींगचे व्यवहार सुरू असल्याचे आढळले. कंपनीच्या संकेतस्थळाच्या वॉलेट मध्ये १ कोटी १४ लाख रुपये होते. जेव्हा छापा घातला तेव्हा २०० गुंतवणूकदार संकेतस्थळावर सक्रीय होते, असे पोलिसांनी सांगितले. या संकेतस्थळाद्वारे १ हजार ५४५ गुंतणवणूकदार सक्रीय होेते. त्या सर्वांची फसवणूक करण्यात आल्याचा संशय आहे.

पोलिसांसमोरच प्रात्यक्षिक

संकेतस्थळावरून गुंतवणूकदारांची कशाप्रकारे फसवणूक केली जाते याचे प्रात्यक्षिक आरोपींनी करून दाखवले. त्यांनी गुगल क्रोम मध्ये संकेतस्थळाची लिंक ओपन केली आणि मल्लिनाथ दत्त नामक एका ग्राहकाचा मेल आयडी ओपन केला. त्या ग्राहकाचे १०० डॉलर म्हणजे ७८ हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. नंतर त्याचे डिजिटल वॉलेट बंद करण्यात आले. मात्र तो पर्यंत ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याचे समजलेच नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

चौघा जणांविरोधात गुन्हे

याप्रकरणात कॉलसेंटरचा मालक रोहीत कदम (३४), अनिल गर (३५) सुनिल गर (२६) आशिष कुमार जैस्वार ( ३६) हे चौघे आरोपी आहेत. गोरेगाव पोलिसांनी या चौघांविरोधात फॉरेक्स ट्रेडींगचे बनावट संकेतस्थळ तयार करून गुंतवणूक दारांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क) ६६ (ड), तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३ (५), ३१६ (२), ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८ आणि ३४० (२) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.