Mumbai Life : डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणाने रेडइट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. रोज ट्रेनने प्रवास करताना कसे हाल होतात किती वेळ लागतो आणि मग आपल्यावर रोज रडायचीच वेळ कशी येते? हे या तरुणाने म्हटलं आहे. हा तरुण डोंबिवलीहून रोज नवी मुंबईत नोकरीसाठी जातो.

काय आहे डोंबिवलीकर तरुणाची पोस्ट?

हा तरुण पोस्टमध्ये म्हणतो, माझं ऑफिस नवी मुंबईत आहे. मी डोंबिवलीत राहतो. मला रोज ऑफिसला लोकलने पोहचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. परत यायलाही तितकाच वेळ. ३ तास प्रवास आणि ९ तास ऑफिसचं काम. यानंतर सगळा उत्साहच संपतो, माझ्यातला त्राणच निघून गेलेला असतो. मी प्रचंड थकून जातो. रोज मनात येतं आज नोकरी सोडावी. मात्र सद्य स्थितीत मी नोकरी सोडू शकत नाही कारण दुसरी कुठलीही ऑफर माझ्याकडे नाही. पण या कॉर्पोरेट आयुष्याचा आणि लोकल प्रवासाचा मला कंटाळा आला आहे.”

ट्रेनच्या प्रवासामुळे रडकुंडीला येतो

पुढे हा डोंबिवलीकर तरुण म्हणतो, “मी रोज ट्रेनचा प्रवास करुन रडकुंडीला येतो आहे. मला जिममध्ये जायला, पुस्तकं वाचायला किंवा माझ्या मनाप्रमाणे काही करायला वेळच उरत नाही. दिवसातले बारा तास जर ऑफिस आणि प्रवासात जाणार असतील तर मी काय करावं? मी घरी आलो की जेवण करतो आणि झोपतो. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला पळतो. हेच चक्र चाललं आहे. मला या सगळ्याचा भयंकर कंटाळा आला आहे.” अशी पोस्ट डोंबिवलीकर तरुणाने लिहिली आहे.

तरुणाची पोस्ट व्हायरल, युजर्स काय म्हणत आहेत?

डोंबिवलीकर तरुणाची पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी ही पोस्ट लाईक तर केलीच आहे. शिवाय सोशल मीडियावर त्याची चर्चाही रंगली आहे. मुंबईत काम करायचं असेल तर इतका प्रवास करावाच लागतो. त्यात काही विशेष नाही असं काही लोक सांगत आहेत. शिवाय काही जणांनी त्याला जवळच कुठे नोकरी मिळेल का ते शोध म्हणजे तुझा वेळ वाचेल असं सांगितलं आहे. तू जर नवी मुंबईपेक्षा डोंबिवली किंवा ठाण्यात, कल्याणला नोकरी शोधलीस तर तुझा प्रवासाचा वेळ वाचेल असंही एका युजरने म्हटलं आहे. आणखी एक युजर म्हणतो अरे मित्रा तुझा तुझा त्रास समजू शकतो. तुझे तरी प्रवासात तीन तास जातात माझे रोज पाच तास प्रवासात आणि नऊ तास ऑफिसमध्ये जातात. मलाही कशासाठीच वेळ मिळत नाही. घरी फक्त जेवायला आणि झोपायला येतो असंच वाटतं. आणखी एक युजर म्हणाला मी नुकताच मुंबईत शिफ्ट झालो आहे. मी समजू शकतो की शहरं आपल्याला किती लवकर आपल्यात सामावून घेतात. मात्र या ठिकाणी राहणं महाग आहे. घरभाडं, प्रवासखर्च हे सगळं निभवता निभवता नाकी नऊ येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात पण…

एक युजर म्हणतो, मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात खरं पण इथली लोकल ट्रेनची व्यवस्था अत्यंत वाईट आहे. लोकल ट्रेनचं जाळं चांगलं पसरलं आहे त्यात काही शंका नाही. पण रोज त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. वाढत्या लोकसंख्येनुसार लोकल ट्रेनच्या डब्यांची क्षमता आणि वेळेवर लोकल धावणं, काही मिनिटांमध्ये ट्रेन येणं हे प्रचंड आवश्यक आहे.