मुंबई– एका आयटी तज्ज्ञाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून नंतर तक्रार मागे घेण्यासाठी १ कोटींची खंडणी मागणाऱ्या एका महिलेला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने एका बॅंक कर्मचाऱ्याला हाताशी धरून फिर्यादीच्या बॅंकेचे तपशील मिळवले होते. याप्रकरणी महिलेसह तिचा भाऊ, मैत्रीण आणि बॅंक कर्मचारी अशा चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लग्नास नकार दिल्याने बलात्काराचा गुन्हा
फिर्यादी ४० वर्षांचा असून कांदिवलीच्या चारकोप परिसरात पत्नी आणि मुलासह राहतो. तो आयटी तज्ञ असून एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. त्याची २०१७ मध्ये सोनी (नाव बदललेेले) नावाच्या एका महिलेशी ओळख झाली होती. फिर्यादी विवाहित होता. मात्र संमतीने दोघांचे प्रेमसंबंध जुळले.
२०२२ मध्ये अचानक सोनीने फिर्यादीला लग्नाचा आग्रह केला. परंतु फिर्यादीचे आधीच लग्न झाले होते आणि त्याने कधी सोनीला लग्नाचे आश्वासन दिले नव्हते. त्यामुळे फिर्यादीने लग्नास नकार दिला. परिणामी सोनीने २०२३ मध्ये फिर्यादी विरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात फिर्यादी १ महिना तुरूंगात होता. या काळात सोनी आणि तिच्या भावाने फिर्यादीच्या बहिणीला संपर्क करून जामिन मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी केली होती.
१ कोटींची मागणी…
जामिनावर सुटल्यानंतर सोनीने फिर्यादीला भेटून सहानभुती व्यक्त केली. दाखल केलेला गुन्हा रागातून आणि गैरसमजातून झाल्याचे तिने सांगितले. ही तक्रार मागे घेण्यासाठी ती तयार असून त्यासाठी तिच्या वकिलांना भेटावे लागेल असे सांगितले. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी सोनीच्या फोर्ट येथील वकिलाला भेटला. त्यावेळी फिर्यादीकडे सोनीने हा गुन्हा रद्द करण्यासाठी १ कोटींची मागणी केली. त्याला फिर्यादीने नकार दिला होता. सोनीची मैत्रीणही पैसे देण्यासाठी दबाव टाकत होती. सोनीने तडजोड करून ५० लाखांची मागणी केली. परंतु तरीही फिर्यादीने नकार दिला. दरम्यान, फिर्यादी पैसे देत नसल्याने सोनीने फिर्यादीच्या कंपनीत तक्रार केली. फिर्यादीवर गुन्हा दाखल असल्याचे सांगितले आणि त्याला कामावरून काढून टाकायला लावले.
बॅंकेचा तपशीलही मिळवला
मे महिन्यात सोनी पुन्हा फिर्यादीला भेटली. फिर्यादीकडे किती पैसे येतात? तो पैसे कुठे खर्च करतो? त्याच्या पत्नीने कुठे कुठे गुंतवणूक केली आहे ? याची माहिती असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीला संशय आला. त्याने तपासणी केल्यावर सोनीने त्याच्या गुगल खात्यावर तिचे दोन्ही मोबाईल क्रमांक जोडल्याचे लक्षात आले. त्याद्वारे सोनीला फिर्यादीच्या बॅंक खात्याचे तपशील, पासवर्ड, ओटीपी सारं काही मिळत असल्याचं लक्षात आलं. हे तपशील मिळवून देण्यात एका बॅंकेच्या कर्मचार्याचाही सहभाग होता.
चौघांविरोधात गुन्हे दाखल
याप्रकरणी फिर्यादीने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चारकोप पोलिसांनी सोनी, तिचा भाऊ, मैत्रीण आणि बॅंकेचा संबंधित कर्मचारी अशा चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कमल ३९८ (७), ६२, ६६ (क), ६६ (ड) ६६ (ई) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी पोलिसांनी सोनीला अटक केली असून तिला ८ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.