मुंबई : जे. जे. रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉ. ओमकार भगवान कवितके (३२) यांनी सोमवारी रात्री उशिरा अटल सेतूवरून समुद्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली. डॉ. ओमकार कवितके मागील काही दिवसांपासून तणावाखाली होते. याबाबत त्यांना जे. जे. रुग्णालय प्रशासनाकडून मानसोपचार तज्ज्ञांची सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याने ते उपचार घेण्यास नकार दिला होता.

जे. जे. रुग्णालयामध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले ओमकार कवितके यांची पुढील काही दिवसांमध्ये व्याख्याता म्हणून पदोन्नती होणार होती. मात्र मागील काही दिवसांपासून ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांना मानसोपचार डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्यांना उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. दरम्यान, डॉ. ओमकार हे नवी मुंबईतील कळंबोली येथे वास्तव्यास होते. त्यांनी आत्महत्येसंदर्भात कोणतीही चिट्टी लिहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र डॉ. ओमकार कवितके यांचा प्रेमभंग झाल्याने ते तणावाखाली असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून समजले.