मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज (दि.३)मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम मार्गावर शनिवारी(दि.२) मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात आला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील आजचा दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल २० मिनिटे उशीराने धावतील अशी माहिती मध्ये रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे माटुंगा-मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मुलुंड स्थानकापासून लोकल पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर धावतील. या काळात काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल फेऱ्या सुमारे २० ते २५ मिनिटे उशीराने धावणार आहेत. माटुंग्याहून कल्याण दिशेकडे जाणारी लोकल मुलुंडपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील. जलद मार्गावर अतिरक्ति स्थानकांअभावी ब्लॉकवेळेत या लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा रोड ते वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० या वेळेत सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.