मुंबईः ११ जुलै,२००६ चा मंगळवार मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला होता. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान माटुंगा ते मिरा रोड दरम्यान सात बॉम्बस्फोट घडले. प्रथम श्रेणीच्या डब्यात घडवून आलेल्या या स्फोटांमध्ये १८६ जणांना मृत्यू झाला. त्यातील एक बॉम्ब ठेवणारा सलीम नावाचा पाकिस्तानी दहशतवादी याच स्फोटात ठार झाला होता, असा दावा पोलिसांकडून त्यावेळी करण्यात आला होता.
१९९३ च्या मुंबईतील साखळी स्फोटानंतर हा मुंबईतील मोठा मानवी संहार होता. त्यात २०९ जणांचा मृत्यू झाला, तर ७०० जण गंभीर जखमी झाले होते. हे सर्व बॉम्बस्फोट प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये घडवून आणल्यामुळे स्फोटांमध्ये उच्च पदावर कार्यरत अधिकारी व व्यापाऱ्यांची संख्या मृतांमध्ये अधिक होती. ११ मिनिटांच्या काळावधीत सात लोकलमध्ये हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. माटुंगा, माहिम, वांद्रे ते खार, खार ते सांताक्रुझ, जोगेश्वरी, बोरीवली व मिरा रोड ते भायंदरदरम्यान सात स्फोट झाले.
सायंकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी या साखळी स्फोटांना सुरूवात झाली आणि ११ मिनिटांनी मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी संपूर्ण लोकल सेवा थांबली. स्फोटांची तीव्रता वाढवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता. या स्फोटांमध्ये दोन पोलीस शिपायांचाही मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सलीम नावाच्या ही एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याला गर्दीमुळे स्थानकांवर उतरता न आल्यामुळे स्फोटांमध्ये त्याचाही मृत्यू झाल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.
एटीएस व गुन्हे शाखेची श्रेयवादाची लढाई
महाराष्ट्र एटीएसने काही आठवड्यांनंतर कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आणि १२ जणांवर आरोप ठेवले. कथितपणे, या लोकल ट्रेन स्फोटांचा कट पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या आदेशावर रचला गेला होता आणि लष्कर-ए-तोयबाने सिमीच्या मदतीने तो अंमलात आणला होता. हे बॉम्ब गोवंडीतील झोपडपट्टीत प्रेशर कुकरमध्ये तयार करण्यात आले होते आणि नंतर मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये लावण्यात आले.
मात्र, २००८ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने इंडियन मुजाहिदीन या कथित अतिरेकी संघटनेच्या सादिक शेख नावाच्या सदस्याला अटक केली आणि प्रकरणाला नवे वळण मिळाले. गुन्हे शाखेने त्यावेळी इंडियन मुजाहिदीननेच या स्फोटांची योजना आखली होती आणि सादिकने इतरांसोबत मिळून बॉम्ब ठेवले होते, असा दावा केला होता. एटीएसच्या दाव्यांना फेटाळून लावत, गुन्हे शाखेने स्फोटात वापरण्यात आलेले बॉम्ब शिवडीतील एका सदनिकेत तयार करण्यात आले होते. त्यावेळी फैजल नावाच्या संशयीताला मिरा रोड येथून गुन्हे शाखेने पकडले होते.
अॅन्टॉपहिलमध्ये चकचक
मुंबईत २००६ चा साखळी स्फोट घडवण्यासाठी ११ दहशतवादी पाकिस्तानातून आले होते. त्यातील एक २२ ऑगस्ट २००६ मध्ये मुंबईतील अॅन्टॉपहिल येथील चकमकीत ठार झाला होता. मोहम्मद अली याला दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) यांंच्या चकमकीत ठार झाला होता. तर, दुसरा बॉम्ब ठेवताना ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता.