विनयभंग, बलात्कार, छेडछाड आदी गुन्ह्यंमध्ये वाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रवासादरम्यान घडणाऱ्या विनयभंग, बलात्कार, छेडछाड आदी महिलांशी संबंधित गुन्ह्य़ांना आळा घालण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही लोहमार्ग पोलिसांची आहे. मात्र महिला प्रवाशांकरिता भक्कम सुरक्षा यंत्रणा उभी करण्यात रेल्वेला अपयश आले आहे. २०१६ पासून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील महिला प्रवाशांच्या संबंधित गुन्ह्य़ांची नोंद पाहता प्रत्येक वर्षी गुन्ह्य़ांची शंभरी पार झालेली दिसून येते. २०१६ ते २०१७ या वर्षांत महिला प्रवाशांच्या संबंधातील तब्बल २०८ विविध गुन्हे लोहमार्ग पोलिसांकडे नोंदले गेले. यात विनयभंगाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे लोकल प्रवास महिलांसाठी असुरक्षितच ठरतो आहे.

मुंबईतील मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तीनही मार्गावरून दिवसाला ७५ ते ८० लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. यात महिलांची संख्या १५ ते २० टक्के आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १२ डब्यांमधील तीन महिला डब्यांत रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत लोहमार्ग पोलीस तैनात असतात. ही व्यवस्था अपुरी पडू लागल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महिलांच्या लोकल डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दीड वर्षांत पश्चिम रेल्वेवरील १२ लोकलच्या महिला डब्यात तर मध्य रेल्वेवरील १० लोकल डब्यांत सीसीटीव्ही बसवण्यात आले. मात्र एकंदरीतच प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्याने रेल्वेने लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी होण्यापूर्वी काही तांत्रिक मुद्देही उपस्थित झाले आहेत. त्यामुळेच याची अंमलबजावणी होण्यास बराच कालावधी जाऊ शकतो.

दरम्यान, महिला  प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात असनाताही रेल्वे प्रशासन किंवा लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून महिलांबाबतीतील गुन्हे रोखण्यास अपयशच येत आहे. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनांना तोंड द्यावे लागत आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१६ पर्यंतची आकडेवारी पाहिल्यास एकूण १०५ तक्रारी दाखल असल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे आहे.

तर २०१७ मधील सप्टेंबर महिन्यापर्यंत तर हाच आकडा १०३ पर्यंत असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही वर्षांत नोंद झालेल्या तक्रारींमध्ये विनयभंगाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत.

२०१६ मध्ये ७४ तर २०१७ मध्ये ७३ तक्रारी विनयभंगाच्या होत्या. त्याखालोखाल अपहरण, बलात्कार आणि छेडछडीच्या तक्रारींचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

* २१ ऑक्टोबरला सीएसएमटी ते बेलापूर लोकलमध्ये महिलेला पाहून अश्लील हावभाव केले. यात आरोपीला अटक करण्यात आली.

* २२ ऑक्टोबर रोजी सीएसएमटी ते कल्याण धिम्या लोकलमधून १४ वर्षीय मुलीने महिला डब्यात प्रवेश केलेल्या एका पुरुष प्रवाशाच्या भीतीने लोकलमधून उडी घेतली.

मनुष्यबळ आवश्यक

रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी ही लोहमार्ग पोलिसांकडे असते, मात्र त्यांना आवश्यक असे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने सुरक्षा पुरविताना त्यांची तारांबळ उडते. सध्या मंजूर असलेल्या ४,०१९ पदांपैकी ३,५४१ पदेच भरण्यात आली आहेत. लोहमार्ग पोलिसांना ६,९६२ एवढे मनुष्यबळ आवश्यक आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यातही महिला प्रवाशांची सुरक्षा हा गंभीर विषय असून रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्षच करते. आरोपीला अटक होते आणि त्यानंतर अधिक खबरदारी घेण्याऐवजी पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होते. यातून रेल्वेचा ढिसाळपणाच दिसून येतो. उच्च न्यायालयानेही महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मुद्दे उपस्थित केल्यांनतर तरी सुरक्षा व्यवस्था उत्तम होईल, अशी आशा होती. परंतु तसे काही झालेले नाही.

– लता अरगडे, अध्यक्ष, तेजस्विनी महिला प्रवासी संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train unsafe for women commuters
First published on: 24-10-2017 at 02:28 IST