मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे पश्चिम उपनगरातील तीन गणेशमूर्तींचे गेल्या पाच महिन्यापासून विसर्जन होऊ शकलेले नाही. उच्च न्यायालयात ३० जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे या मंडळांचे लक्ष लागले आहे. पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी राज्य सरकारने तीन आठवड्यात धोरण तयार करावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याची मुदत ३० जून रोजी संपणार आहे. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींना नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी मिळेल या आशेवर या मंडळांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.
माघी गणेशोत्सवाला तब्बल सहा महिने झाले तरी पश्चिम उपनगरातील तीन मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. डहाणूकरवाडी येथील कांदिवलीचा श्री आणि कांदिवलीतील चारकोपचा राजा आणि बोरिवली पूर्वेकडील कार्टर रोडचा गणपती या तीन मंडळांच्या पीओपीच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. त्यापैकी बोरिवलीच्या मंडळाची मूर्ती मूर्तिकाराने परत कारखान्यात दिली. तर उर्वरित दोन मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास नकार दिल्यामुळे हे विसर्जन अद्याप होऊ शकलेले नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे पालिका प्रशासनाने कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र मूर्तींची उंची जास्त असल्यामुळे व कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास या मंडळांनी नकार दिला. कांदिवलीचा श्री मंडळाने आपली मूर्ती मंडपालगतच्या मैदानात झाकून ठेवली आहे तर चारकोपचा राजा या मंडळाने मूर्ती अज्ञात स्थळी झाकून ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नी तोडगा निघेल या आशेवर ही दोन मंडळे राज्य सरकारकडे डोळे लावून बसले होते.
पीओपीच्या मूर्तींच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पीओपी मूर्ती घडवण्यावर आणि त्याची विक्री करण्यावर बंदी नसल्याची भूमिका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जून महिन्यात उच्च न्यायालयात माडल्यानंतर उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी राज्य सरकारने तोडगा काढावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पीओपी मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांना दिलासा मिळाला असला तरी त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या उंच मूर्ती्च्यं विसर्जनाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी राज्य सरकारने तीन आठवड्यात, ३० जून पर्यंत धोरण तयार करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच उंच मुर्तींना समुद्रातच विसर्जन करण्यास परवानगी द्यावी अशी भूमिका गणेशोत्सव समन्वय समितीने घेतली आहे. त्यामुळे कांदिवलीतील या दोन मंडळांना न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
पावसाळ्यात मूर्ती सांभाळणे अवघड
कांदिवलीचा श्री गणपती मंडळाचे सागर बामणोलीकर यांनी सांगितले, एका मंडळाची मूर्ती ही तलावात अर्धवट विसर्जित झाली होती. त्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जन केले आणि मुर्तीची विटंबना झाली तर मंडळाचे नाव बदनाम होईल अशी भीती आम्हाला होती. म्हणून आम्ही विसर्जन केले नव्हते. पण आता भाद्रपदातील मंडळांनी गणेश पाद्यपूजन केले असून पीओपीच्या मूर्ती आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे काहीतरी तोडगा निघेल असा आम्हाला विश्वास आहे. तोडगा निघाला तर आम्ही लगेचच मार्वे समुद्र किनारी विसर्जन करू अन्यथा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यापलिकडे आमच्याकडे पर्याय नाही. पावसाळ्यात मूर्ती सांभाळून ठेवणे अवघड जात असल्याचेही बामणोलीकर म्हणाले.
काही झाले तरी कृत्रिम तलाव नकोच
दरम्यान, चारकोपचा राजा माघी गणेशोत्सव मंडळाचे निखिल गुढेकर यांनी सांगितले की मी मूर्ती अतिशय व्यवस्थित सांभाळून ठेवली आहे. काही झाले तरी मी कृत्रिम तलावात विसर्जन करणार नाही असा निर्धारही त्यांनी केला आहे. मूर्तीचा पुनर्वापर करण्याचा पर्यायही आम्ही चाचपडून बघू. सध्यातरी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.