scorecardresearch

इंटरनेटवर जेवण शोधणं पडलं महागात, सायबर ठगांनी घातला ८९ हजारांचा गंडा; मुंबई पोलिसांनी ‘असं’ शोधलं आरोपींना

इंटरनेटवर जेवणाचा डबा शोधणाऱ्या एका मुंबईतल्या नागरिकाला सायबर ठगांनी फसवल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

cyber Crime
मुबंईत सायबर गुन्हे वाढत आहेत.

मुंबईत सातत्याने सायबर फसवणुकीची प्रकरणं समोर येत आहेत. नुकतंच एक प्रकरण मुंबईच्या ग्रँड रोड भागात पाहायला मिळालं आहे. सायबर ठगांनी येथील एका रहिवाशाला एसएमएसद्वारे फ्रॉड लिंक पाठवून त्याची ८९,००० रुपयांना फसवणूक केली होती. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी झारखंडच्या सायबर ठगांना अटक केली आहे.

फसवणुकीची ही घटना ५ जानेवारीची आहे. तक्रारदार मुंबईकर इंटरनेटवर जेवणाच्या डब्याचा पर्याय शोधत होता. इंटरनेटवर त्याला एक नंबर मिळाला. त्यानंतर त्याने त्या नंबरवर कॉल केला. त्यावेळी पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने एक लिंक पाठवली आणि सांगितलं की, तुम्हाला आधी या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. तसेच त्याला ५ रुपये भरण्यास सांगितले जे परत केले जातील असंही सांगितलं.

तक्रारदाराने त्याला जे काही सांगण्यात आलं, त्या सर्व गोष्टी त्याने फॉलो केल्या. तसेच ५ रुपयांचं पेमेंटही केलं. काही वेळाने त्याला मेसेज आला, त्यात लिहिलं होतं की, “तुमची ऑर्डर रद्द झाली आहे”. तसेच त्याला त्याच नंबरवरून आणखी एका लिंकचा मेसेज आला. त्यावर क्लिक केल्यानंतर काहीच मिनिटात त्याच्या बँक खात्यातून ८९,००० रुपये वजा झाल्याचा मेसेज त्याला आला.

हे ही वाचा >> “गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी…” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “मी स्वतः अमित शाहांशी बोलणार”

बँक अकाऊंटद्वारे आरोपींना शोधलं

सायबर ठगांनी आपल्याला गंडा घातल्याचे लक्षात येताच त्याने लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सायबर टीमसह या प्रकरणाचा तपास सुरू केला. सायबर टीमने ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते आणि ज्या मोबाईल नंबरवरून त्यांनी पीडित व्यक्तीशी संपर्क साधला होता त्याची माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे त्यांना आरोपींचा माग काढण्यात यश आलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नागेश्वर मालो ठाकूर (२९) आणि संतोष कुमार भालदेव मंडल (२९) या दोघांना अटक केली आहे. हे दोघे झारखंडमधील दुमका गावचे रहिवासी आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 12:31 IST

संबंधित बातम्या