मुंबई : प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर मुंबई क्रुझ टर्मिनल – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा पूर्णत: बंद करण्यात आली आहे. जलवाहतूक व्यवस्था बळकट करून मुंबई आणि मुंबई महानगरातील प्रवास सुकर, अतिजलद व्हावा यासाठी मुंबई बंदर प्राधिकरण, तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाने २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने १ नोव्हेंबर २०२२ रोजी २०० प्रवासी क्षमतेची अत्याधुनिक सुविधा असलेली वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली.
मुंबई क्रुझ टर्मिनल – मांडवा अशी आठवडय़ातील सातही दिवस वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली. या वॉटर टॅक्सीमुळे केवळ ४० मिनिटांत मांडव्याला जाणे शक्य होऊ लागले. पर्यटकांचे आकर्षणाचे पर्यटनस्थळ असलेल्या अलिबागला जाणाऱ्यांकडून या सेवेला प्रतिसाद मिळेल या विश्वासाने ही सेवा सुरू करण्यात आली. यासाठी ४०० ते ४५० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले. मात्र सुरुवातीपासून या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही.
प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनीने तिकीट दर कमी केले. मात्र त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर डिसेंबरमध्ये सात दिवसांऐवजी केवळ दोन दिवस या मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सोमवार ते शुक्रवारदरम्यानची सेवा बंद करण्यात आली. सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवार पर्यटकांचा प्रतिसाद मिळेल असे कंपनीला वाटत होते. मात्र या दिवशीही प्रतिसाद न मिळाल्याने आता शनिवार- रविवारच्या मुंबई- मांडवादरम्यानच्या दोन फेऱ्याही बंद करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया सेवा सुरू
बेलापूर- गेट वे ऑफ इंडिया सेवा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० वाजता बेलापूरवरून वॉटर टॅक्सी सुटणार असून ती ९.३० वाजता गेट वे ऑफ इंडियाला पोहोचणार आहे. तर गेट वे ऑफ इंडिया येथून संध्याकाळी ६.३० वाजता वॉटर टॅक्सी सुटणार असून ती ७.३० वाजता बेलापूर जेट्टीवर पोहचणार आहे. त्याच वेळी मुंबई- मांडवा अशी शनिवार-रविवारची सेवा बंद करून या दिवशी बेलापूर- मांडवा अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. शनिवार- रविवार सकाळी ९ वाजता बेलापूर- मांडवा आणि सायंकाळी ६ वाजता मांडवा- बेलापूर अशी वॉटर टॅक्सी धावणार आहे. बेलापूर- गेट वे ऑफ इंडियासाठी २५० रुपये, तर बेलापूर- मांडवासाठी ३०० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.