मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय आहे. मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई शहर, तसेच उपनगरांत मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत पुढील दोन-तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांत मंगळवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. शहरातील मलबार हिल, कुलाबा, प्रभादेवी, दादर, चर्चगेट परिसरात दुपारनंतर पावसाने जोर धरला.

जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याचबरोबर उपनगरातील बोरिवली, गोरेगाव आणि अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ४.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ५४.२ मिमी पावसाची नोंद झाली. शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने मुंबईत काही दिवस विश्रांती घेतली होती. परिणामी, मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत होता. मात्र, मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सखल भागात पाणी

मुंबईत मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले. अंधेरीमधील भुयारी मार्ग जलमय झाला होता. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नोकरदारांची तारांबळ उडाली. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. सायंकाळी पावसाने उसंत घेतली. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाचा अंदाज फोल

हवामान विभागाने सोमवारपासून पुढील दोन- तीन दिवस मुंबईसह कोकण आणि इतर भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज फोल ठरवत सोमवारी मुंबईत दिवसभर पाऊस पडला. त्यानंतर रात्री काहीं प्रमाणात पावसाचा जोर वाढला. मंगळवारी सकाळपासून मुंबईत पाऊस पडत आहे. दुपारी साडेबारा नंतर हवामान विभागाने इशारा जारी केला.