मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत महिन्याभरातच प्रचंड वाढ झाली आहे. एका महिन्यातच दैनंदिन प्रवासी संख्येने सहा वेळा विक्रमी नोंद केली. १८ जून रोजी दोन लाख ९४ हजार ९७३ असलेली दैनंदिन संख्या १५ जुलै रोजी थेट तीन लाख ११ हजार ३०५ वर पोहोचली. १५ जुलैची प्रवासी संख्या आतापर्यंतची सर्वाधिक, विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्या आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्पांतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर या मार्गिकांना मुंबईकरांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण मागील एक वर्षापासून प्रवासी संख्येत वाढ होत असून या वर्षी दैनंदिन प्रवासी संख्येने थेट तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. सुरुवातीला या मार्गिकेवरून दिवसाला ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. आता दैनंदिन प्रवासी संख्या ३० हजारावरून तीन लाखांवर गेली आहे. केवळ एका महिन्यात या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने सहा वेळा विक्रमी नोंद केल्याची माहिती या मार्गिकेचे संचलन करणाऱ्या महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) दिली.
१८ जून रोजी दोन लाख ९४ हजार ९७३ प्रवाशांनी, २४ जूनला दोन लाख ९७ हजार ६०६ प्रवाशांनी, १ जुलैला दोन लाख ९७ हजार ९७२ प्रवाशांनी, ८ जुलैला तीन लाख १ हजार ३०३ प्रवाशांनी या मार्गिकांवरून प्रवास केला होता. ही सर्व विक्रमी प्रवासी संख्या होती. तर आता १५ जुलैला दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रमी नोंद केली आहे. १५ जुलैला तीन लाख ११ हजार ३०५ प्रवाशांनी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकावरून प्रवास केला आहे.
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत अवघ्या काही महिन्यातच मोठी वाढ झाल्याने आणि येत्या काळातही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने मेट्रो गाड्यांच्या ताफ्यात बुधवारपासून तीन नव्या गाड्यांची भर टाकली आहे. या नवीन तीन गाड्यांमध्ये या मार्गिकांवरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. २१ फेऱ्या वाढल्या असून एकूण फेऱ्यांची संख्या २८४ वरून आता ३०५ फेऱ्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढतानाच फेऱ्या आणि गाड्यांची संख्या वाढवल्याने मेट्रो सेवेवर ताण पडणार नाही याची खबरदारी एमएमआरडीए आणि एमएमओसीएलने घेतली आहे.