मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच या मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून ३९ महिन्यांच्या कालावधी या मार्गिकेवरुन प्रवास करणार्या प्रवाशांची एकूण संख्या २० कोटींवर पोहचली आहे. या मार्गिकेवरुन सध्या दिवसाला सरासरी दोन लाख ६० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पातील मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका एप्रिल २०२२ मध्ये अंशत: आणि जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल झाल्या आहेत. या मार्गिकांमुळे पश्चिम उपनगरांसाठी मेट्रो १ (घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा) मार्गिकेनंतर आणखी दोन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्या. अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर असा प्रवास अतिजलद करण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे या मार्गिकेला चागंला प्रतिसाद मिळेल असे वाटत असतानाच सुरुवातीला मुंबईकरांना या मार्गिकांना प्रतिसाद दिला नाही. मात्र मागील एक ते दीड वर्षांपासून या मार्गिकेवरील प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असून दैनंदिन प्रवासी संख्या विक्रम नोंदवत आहे.

८ जुलैला या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने चक्क तीन लाखांचा टप्पा पार केला. या दिवशी या मार्गिकांवरुन तीन लाख १ हजार १२७ प्रवाशांनी प्रवास केला. त्यात पावसाळ्यात मुंबईकरांची मेट्रोला चांगली पसंती मिळत असल्यानेही प्रवासी संख्येत वाढ होत आहेत. त्यामुळेच मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून आतापर्यंत, ३९ महिन्यांच्या कालावधीत या मार्गिकांवरुन एकूण २० कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीएकडून ई तिकीट योजनेला प्राधान्य दिले जात आहे. तर दुसरीकडे १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना, दिव्यांगांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना पासवर आणि मुंबई १ कार्डवर २५ टक्क्यांची सवलतही देण्यात येत आहे. यामुळे प्रवासी संख्या वाढण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे. या दोन्ही मार्गिका सेवेत दाखल झाल्या त्या दिवशी, अर्थात पहिल्या दिवशी या मार्गिकांवरुन १९ हजार ४५१ प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर ९ महिन्यांत या मार्गिकांवरुन एकूण एक कोटी प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर एकूण प्रवासी संख्या १० कोटी होण्यासाठी २५ महिन्यांचा कालावधी लागला.

पण मागील एक ते दीड वर्षात प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असल्याने १० कोटी प्रवासी संख्येनंतर पुढील १० कोटी प्रवासी संख्या पार करण्यासाठी केवळ १४ महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्यामुळेच मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून, एप्रिल २०२२ ते ४ आॅगस्ट २०२५ या ३९ महिन्यांच्या कालावधी एकूण प्रवासी संख्या २० कोटींवर गेली आहे.