मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून या दोन्ही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने बुधवार, १८ जून रोजी विक्रम केला. या मार्गिकेवरून बुधवारी तब्बल २ लाख ९४ हजार ६११ प्रवाशांनी प्रवास केला. या दोन्ही मार्गिकांवरील आतापर्यंतची ही सर्वाधिक प्रवासी संख्या आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो मार्गिकांच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील दहिसर ते डहाणूकरवाडी – आरे असा २० किमीचा टप्पा एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. या दोन्ही मार्गिकांवरील दुसरा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला असून तेव्हापासून ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ पूर्ण क्षमतेने धावू लागली. या दोन्ही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता मात्र या मार्गिकांकडे प्रवाशांचा कल वाढत असून प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली आहे.
सुरुवातीला असलेली प्रतिदिन ३० हजार प्रवासी संख्या आता थेट २ लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. दिवसाला सरासरी इतके प्रवासी प्रवास करतात. तर वर्षभरात दैनंदिन प्रवासी संख्येने २ लाख ६० हजारांची संख्या पार करत विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्या नोंदवली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी या मार्गिकांवरून २ लाख ६९ हजार २३० प्रवाशांनी प्रवास केला होता. या मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासूनची ही विक्रमी प्रवासी संख्या होती. त्यानंतर १३ ऑगस्ट २०२४ रोजी २ लाख ७८ हजार ४४३ प्रवाशांनी, ३ सप्टेंबर २०२४ रोजी २ लाख ७९ हजार ७१७ प्रवाशांनी, ५ सप्टेंबर २०२४ रोजी २ लाख ८१ हजार २४९ प्रवाशांनी, तर ७ ऑक्टोबर २०२४ रोजी २ लाख ९२ हजार ५७५ प्रवाशांनी प्रवास केला. २ लाख ९० हजार ५७५ ही आतापर्यंतची विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्या होती. मात्र आता दैनंदिन संख्येने हा विक्रम मोडला असून बुधवार, १८ जून रोजी २ लाख ९४ हजार ६९१ प्रवासी संख्येचा विक्रम नोंदल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
पावसाळ्यात लोकल सेवा विस्कळीत होते वा लोकल विलंबाने धावतात, अशावेळी अनेक जण मेट्रोचा पर्याय निवडतात. त्यामुळे मेट्रोला प्रतिसाद वाढत आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीए विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाही परिणाम म्हणून प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.