मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो ३ ची सेवा आता रविवारी सकाळी साडे सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. मेट्रो ३ मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सेवा सकाळी ८.३० वाजता सुरू होते. पण आता मात्र ३१ ऑगस्टपासून मेट्रो ३ ची सेवा रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी साडे सहा वाजल्यापासून सुरू राहणार आहे.
मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत मेट्रो ३ धावते. तर रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी ८. ३० ते रात्री १०.३० या वेळेत सुरू राहते. सुट्टीच्या दिवशी सकाळी मेट्रोने प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांची काहीशी गैरसोय होत होती. पण आता मात्र प्रवाशांची ही गैरसोय आता दूर होणार आहे.
कारण आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही मेट्रो ३ ची सेवा सकाळी लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मेट्रोची सेवा सकाळी ८.३० ऐवजी सकाळी ६.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.
गणेशोत्सवासाठी ही सेवा कालावधीत वाढ
गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत भाविक गणपती दर्शनासाठी येत-जातात. तर देखावा पाहण्यासाठी जाणाऱ्या-येणाऱ्यांची ही संख्या मोठी असते. अशावेळी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी एमएमआरसीएलने सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान मेट्रो ३ च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत दीड तासांची वाढ
होणार आहे. दीड तासांने सेवा कालावधी वाढणार असल्याने फेऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. ७ सप्टेंबरपासून मात्र रविवार ते सोमवार दरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत धावणार आहे.