मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील डायमंड गार्डन – मंडाले दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण सप्टेंबर अखेरीस करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवड्याभरात पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या टप्प्याचे लोकार्पण ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. हा टप्पा ३० सप्टेंबर रोजी वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी एमएमआरडीए सज्ज असून आता त्यांना केवळ सुरक्षा प्रमाणपत्राची आणि राज्य सरकारकडून लोकार्पणासाठी हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे.
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार अंधेरी पश्चिम – मंडाले दरम्यान मेट्रो २ ब मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २२ किमी लांबीच्या आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. मंडाले – डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन – मंडाले असे हे दोन टप्पे आहेत.
या दोन टप्प्यांतील डायमंड गार्डन – मंडाले टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या टप्प्यातील मार्गिकेच्या कामाला वेग देऊन एप्रिल २०२५ मध्ये डायमंड गार्डन – मंडालेदरम्यान मेट्रो गाड्यांच्या आणि विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. आता चाचण्या अंतिम टप्प्यात असून आठवड्याभरात या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरआधीच, सप्टेंबरअखेरीस पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची तयारी एमएमआरडीएची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करणार आहेत. याच दिवशी कुलाबा – वांद्रे – आरे मेट्रो ३ भुयारी मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले.
मात्र मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याच्या लोकार्पणाबाबत मुख्यमंत्री यावेळी काहीही बोललेले नाहीत. पण मेट्रो २ ब मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचेही ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण होण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा राज्य सरकारकडून होण्याची केवळ प्रतीक्षा असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.