मुंबई : महिना उलटूनही या भुयारी मेट्रोला अजूनही मुंबईकरांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) अपेक्षित प्रवाशी संख्या गाठता आली नसून आजवर सहा लाख १२ हजार ९१३ जणांनी भुयारी मेट्रो प्रवास केला. या मार्गिकेवर एमएमआरसीला दिवसाला साडे चार लाख प्रवाशी संख्या अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात दिवसाला सरासरी २० ते २० हजार ५०० अशी प्रवासी संख्या आहे.

एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे बांधकाम केले जात आहे. या ३३.५ किमीमधील १२.५ किमी लांबीचा आरे ते बीकेसी असा टप्पा ७ ऑक्टोबरपासून वाहतूक सेवा सुरू झाली आहे. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो मार्गिका असल्याने आणि उपनगरीय रेल्वे सेवा पोहोचत नाही अशा भागांना ही मेट्रो जोडत असल्याने या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात आरे ते बीकेसी टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

हे ही वाचा… सलमानपाठोपाठ शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी, ५० लाखांच्या खंडणीची मागणी!

पहिल्या दिवशी अर्थात ७ ऑक्टोबर रोजी या मार्गिकेवरुन १८ हजार ०१५ जणांनी प्रवास केला होता. त्यानंतर, हळूहळू प्रवासी संख्या वाढली. मात्र, ही प्रवाशी संख्या सरासरी २० ते २० हजार ५०० प्रतिदिन अशी मर्यादित आहे.

या मार्गिकेवरुन ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ६ लाख १२ हजार ९१३ जणांनी प्रवास केला आहे. कुलाबा ते आरे या संपूर्ण मार्गिकेवर प्रतिदिन १७ लाख अशी प्रवाशी संख्या अपेक्षित आहे. तर आरे ते बीकेसी मार्गिकेवर प्रतिदिन साडे चार लाख अशी प्रवासी संख्या अपेक्षित आहे. असे असताना एमएमआरसी महिन्याभरात प्रतिदिन सरासरी अंदाजे २० ते २० हजार ५०० वर प्रवासी संख्या थांबली आहे. त्यामुळे, ‘एमएमआरसी’कडून विविध प्रयत्न केले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

हे ही वाचा… Maharashtra Assembly Election 2024 Live : उद्धव ठाकरेंचा इशारा “संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुविधांचा अभाव

आरे ते बीकेसी मार्गिकेवरील मेट्रो स्थानकाला पोहोचण्यासाठी किंवा मेट्रो स्थानकापासून इच्छित स्थळी जाण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध नसल्याने, रिक्षा, टॅक्सी अथवा बेस्ट बसचे थांबे नसल्याने मुंबईकर या मार्गिकेकडे वळत नसल्याचे म्हटले जात आहे. तर, या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच आवश्यक त्या सर्व सुविधा प्रवाशांना उपलब्ध होतील आणि भुयारी मेट्रो प्रवास सुकर होईल, असा विश्वास एमएमआरसीने व्यक्त केला आहे.