येणार, येणार म्हणून गेली दहा वर्षे मुंबईकरांना जिची वाट पाहिली, ती मेट्रो रविवारी मुंबईच्या सेवेत रूजू झाली. वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर रविवारी सकाळी मेट्रो धावायला सुरुवात झाली अन् तिला पाहायला, नव्हे अनुभवायला अवघी मुंबई धावली. रविवारची सुट्टी आणि वातानुकूलित ‘हवाई’ सफरीचा आनंद लुटायला आलेल्या मुंबईकरांनी अक्षरश: ‘जीवाची मेट्रो’ साजरी केली. सकाळी अकरापासून धावण्यास सुरुवात झाल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत तब्बल दोन लाख प्रवाशांनी ही ‘यादगार’ सफर केली. मात्र, प्रचंड गर्दी आणि पहिल्याच दिवसाचा गोंधळ यामुळे मेट्रोचे ‘तात्पुरते’ वेळापत्रक विस्कटले.
पहिल्याच दिवशी मेट्रो रेल्वे उशिराने धावत होती. अनेकदा गाडय़ा एकेका स्थानकावर पाच-पंधरा मिनिटे थांबल्या. तर काहीवेळा मध्येच थांबत होत्या. परिणामी प्रवासासाठी २१ मिनिटांऐवजी पाऊण तासही खर्ची पडत होता. उद्घाटनाच्या दिवशीच तांत्रिक बिघाड झाल्याची चर्चा रंगत होती. मात्र, गर्दीचे व्यवस्थापन करण्यातूनच वेळापत्रक विस्कळीत झाले, असा दावा ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’च्या अधिकाऱ्यांनी केला. मेट्रोचे वेळापत्रक अद्याप निश्चित नसले तरी सध्या गर्दीच्या वेळेत दर चार मिनिटांनी तर निवांत वेळेत दर आठ मिनिटांनी एक गाडी सोडण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
२७०  फेऱ्या दररोज
२,००,००० हून अधिक मुंबईकरांनी रविवारी मेट्रोसफरीचा आनंद लुटला.
सवलतीचा दर महिनाभर
मेट्रो रेल्वेसाठी आता महिनाभर दहा रुपयांचे विशेष सवलतीचा तिकीट दर आहे. त्यानंतर तो १० रुपये, २० रुपये, ३० रुपये आणि ४० रुपये असेल असे दरपत्रक ‘रिलायन्स’ने मेट्रोस्थानकांवर लावले आहे.
राज्य सरकारचे नमते
मेट्रोचे तिकीटदर वाढवण्याच्या ‘रिलायन्स’च्या निर्णयाचा विरोध म्हणून उद्घाटनाला न जाण्याचा इशारा देणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यक्रमाला हजेरी लावलीच; पण मेट्रोच्या दराबाबत न्यायालयातच तोडगा निघेल, असे सांगून ‘रिलायन्स’पुढे नमते घेतल्याचेही दाखवून दिले.
मेट्रो रेल्वेच्या ताफ्यात सध्या एकूण १६ गाडय़ा असून त्यापैकी रोज १४ गाडय़ा प्रवासी फेऱ्यांसाठी वापरण्यात येतील. एक गाडी राखीव ठेवण्यात येईल. तर एक गाडी देखभाल दुरुस्तीसाठी कारडेपोत असेल.
‘रिलायन्स’ने मेट्रोच्या दररोज २७० ते २८० फेऱ्या चालवण्याचे निश्चित केले आहे. सद्यस्थितीत दररोज सव्वा चार लाख प्रवासी प्रवास करतील, असा दावा कंपनीने केला आहे. मेट्रोच्या एका डब्याची प्रवासीक्षमता ३७५ असून संपूर्ण गाडीत एका वेण्ी १५०० प्रवासी प्रवास करू शकतील.