मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील काही मोनोरेल गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या मार्गिकेवरील गाड्या विलंबाने धावत आहेत. ऐन कार्यालयीन वेळेत मोनोरेल गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
देशातील एकमेव मोनोरेल मार्गिका अशी ओळख असलेली २० किमी लांबीच्या चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून तोट्यात आहे. या मार्गिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. विविध प्रयत्न केल्यानंतरही प्रवासी संख्या वाढलेली नाही. मोनोरेल गाड्यांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होत आहेत. परिणामी, मोनोरेलच्या फेऱ्या सातत्याने रद्द कराव्या लागत आहेत. कधी कधी ३०-३० मिनिटांनी वा तासाभराने मोनोरेल धावत असल्याची तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येते.
मेट्रोच्या काही गाड्यांमध्ये सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम मोनोरेल सेवेवर झाल्याची माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) देण्यात आली. लवकरच बिघाड दूर होईल आणि मोनोरेल सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती एमएमएमओसीएलकडून देण्यात आली. तर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल एमएमएमओसीएलने दिलगिरी व्यक्त केली आहे.
मोनोरेल गाड्यांमधील बिघाडामुळे काही गाड्या मानोरेल मार्गिकेवर विलंबाने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला आहे.