मुंबई : मुंबई महानगरपालिकेला लागू असलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. गोपाळकाला व अनंत चतुर्दशीऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठा गौरी विसर्जनाच्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, पूर्वी सुट्ट्या शनिवारी असल्याने कामगारांनी सलग दोन दिवस बाहेरगावी जाण्याचे बेत आखले होते. मात्र, आता शुक्रवारी सुट्टी देण्यात आल्याने कामगारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याबाबत द म्युनिसिपल युनियनने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून सुधारित सुट्ट्यांबाबतच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने २०२५ मधील सार्वजनिक सुट्या जानेवारी महिन्यात जाहीर केल्या. महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळून गोपाळकाला (दहिहंडी) आणि अनंत चतुर्दशीनिमित्त अनुक्रमे १६ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली होती. या दोन्ही सुट्ट्या शनिवारी होत्या. मार्चमध्ये जारी करण्यात आलेल्या दुसऱ्या परिपत्रकातही या सुट्ट्या कायम ठेवण्यात आल्या होत्या. असे असतानाच ७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नव्या परिपत्रकात या सुट्ट्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

नव्या परिपत्रकात पूर्वीच्या सुट्या रद्द करून त्याऐवजी अनुक्रमे ८ ऑगस्ट व २ सप्टेंबर रोजी अनुक्रमे नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठा गौरी विसर्जनानिमित्त सुट्या जाहीर केल्या. परिणामी, महापालिकेच्या ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाने सुट्ट्यांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नव्याने जाहीर केलेल्या सुट्ट्यांपैकी एक सुट्टी शुक्रवारी येत आहे. त्यामुळे कामगारांना सलग सुट्टीचा उपभोग घेता येणार नाही.

महापालिकेच्या ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना फक्त रविवारी आठवड्याची सुट्टी असते. तसेच, महापालिकेच्या पूर्वीच्या परिपत्रकातील सुट्ट्यांनुसार शनिवारी त्यांना सार्वजनिक सुट्टी मिळणार होती. त्यामुळे सलग सुट्टीमुळे कामगारांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले होते. मात्र, नव्या परिपत्रकातील सुट्ट्यांमुळे कामगारांच्या बाहेरगावी जाण्याच्या योजनेवर विरजण पडले आहे. तसेच शनिवारी अनुपस्थित राहिल्यास त्यांना एकूण ३ दिवसांची सुट्टी घ्यावी लागणार आहे. याबाबत द म्युनिसिपल युनियनने नाराजी व्यक्त केली आहे.

गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी या दोन्ही दिवशी मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. दरम्यान, महापालिकेने यापूर्वी नारळी पौर्णिमा व गौरी विसर्जन या दिवशी कधीही सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सुट्ट्यांबाबतच्या सुधारित निर्णयांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी द म्युनिसिपल युनियनने केली आहे.

‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना नारळी पौर्णिमा आणि गौरी विसर्जनाच्या सुट्टीसोबत गोपाळकाला (दहिहंडी) आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी जाहीर करावी, त्याबाबत नवीन परिपत्रक जारी करावे, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे.