मुंबई : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबई महापालिकेने सुरू केलेली स्वच्छता मोहीम अद्याप सुरू असून शनिवारी एका दिवसात सुमारे ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. १ हजार २२० कामगार, १७१ संयंत्रांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एकाच दिवसात ८५ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

मुंबई महानगरात गेल्या २९ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जाते. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे. याअंतर्गत शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

हेही वाचा : मुंबईसह ठाण्यात पावसाची शक्यता

सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत शनिवारी ८५ मेट्रिक टन राडारोडा, २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. सुमारे ३१६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली. १ हजार २२० कामगार – कर्मचाऱ्यांनी १७१ संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी करण्यात आली. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर आदी वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणांचाही मोहिमेत वापर करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण मुंबईत संग्रहालय विभाग , गणेश नगर, कुपरेज मार्ग, नाथालाल पारेख मार्ग, ग्रॅंट रोडमध्ये पट्ठे बापूराव मार्ग, एडनवाला मार्ग, सायन माहेश्वरी उद्यान ते वडाळा पाच उद्यान मार्ग, माहीम कॅाज वे पूल ते मिलन सब वे, वाकोला पोलीस स्थानक परिसर, कुर्ला पूर्व येथील स. गो. बर्वे मार्ग, मदर डेअरी मार्ग, शरदवाडी चेंबुर, घाटकोपर पश्चिम येथील वर्षा नगर मार्ग, गोरेगाव आरे मार्ग, कांदिवली पश्चिम येथे नवा जोड मार्ग, दहिसर पश्चिम, आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.