मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे अतिशय चांगल्या दर्जाची आणि पारदर्शक व्हायला हवीत. त्यामुळे या कामात हयगय करणाऱ्या कंत्राटदारास मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच महापालिकेमार्फत नोटीस बजावण्यात आली, असे मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. ‘मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारास नोटीस’ या मथळय़ाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी प्रसिद्ध झाले होते. संबंधित कंत्राटदार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असल्याची बाब तथ्यहिन असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारास नोटीस; शहरातील रस्त्यांच्या कामांची रखडपट्टी, भाजपच्या तक्रारीनंतर कारवाई

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व्हावे आणि मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्त्यांवरून प्रवास करता यावा, ही मूळ संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. गेली अनेक वर्षे मुंबईच्या रस्त्यांच्या कामांवर हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. प्रत्यक्षात मुंबईकरांच्या पदरात काय पडले, हे चित्र बदलावे, त्यासाठी ही कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करण्याच्या काटेकोर सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेस वारंवार दिल्या आहेत. यामध्ये कोणतीही हयगय होता कामा नये. यासंबंधी पूर्ण दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. महापालिकेकडून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणेच कामकाज होत आहे. ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. कामे दर्जेदार होत नसतील आणि कामचुकारपणा होत असेल तर ते खपवून घेता कामा नयेत, असे स्पष्ट आदेश महापालिकेस देण्यात आले आहेत. त्यानुसारच कामात हयगय करणाऱ्या कंत्राटदारास नोटीस बजाविण्यात आली आहे.