मुंबई : मुंबई शहर व उपनगरांतील रस्त्यांवर दिवसेंदिवस पसरत असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे शहराला बकाल रूप येऊ लागले आहेत. महापालिकेकडून नियमितपणे कचरा संकलन व त्याची विल्हेवाट लावली जात असली तरीही अनेक ठिकणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले दृष्टीस पडतात. रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने आता ‘स्वच्छतेसाठी रस्ते/ मार्ग दत्तक घेण्यासाठी मोहीम’ हा विशेष उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विभाग स्तरावर रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विभागातील लहान-मोठ्या किमान पाच रस्त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपविण्यात येणार आहे.

मुंबईतील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून त्यामुळे शहर अस्वच्छ होत आहे. अनेक भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे निदर्शनास येते. परिणामी, संबंधित परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्यांवरील कचऱ्याच्या समस्येचे निराकरण होत नाही. मात्र, आता महानगरपालिकेने रस्त्यांच्या अस्वच्छतेवर नियोजनपूर्वक नवीन तोडगा काढला आहे.

शहराच्या एकूण स्वच्छतेच्या पातळीत लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठी, महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याने ‘स्वच्छतेसाठी रस्ते/मार्ग दत्तक घेण्याकरिता मोहीम’ नावाचा एक विशेष उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा उद्देश सर्व प्रशासकीय विभागातील घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या सक्रिय सहभागातून प्रमुख रस्ते व मार्गाची देखभाल करणे हा आहे. पालिकेच्या २५ विभागांमध्ये अंदाजे २४६ कनिष्ठ पर्यवेक्षक कार्यरत आहेत. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कनिष्ठ पर्यवेक्षक नियमित स्वच्छता आणि देखभालीसाठी किमान पाच प्रमुख रस्ते किंवा मार्ग दत्तक घेईल. त्यानुसार, मुंबईतील एकूण १००० हून अधिक रस्ते किंवा मार्गांची स्वच्छता सुनिश्चित होईल.

प्रत्येक दत्तक घेतलेल्या प्रमुख रस्त्यावर किंवा मार्गावर व्यापक स्वच्छता आणि परिपूर्ण देखभालीची कामे केली जातील. यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागाची संपूर्ण साफसफाई व स्वच्छता करणे, रस्त्यावर पडलेले टाकाऊ पदार्थ, बांधकाम कचरा (डेब्रिज) आणि असामान्य वस्तू काढून टाकणे अशी कामे समाविष्ट असतील. तसेच, दुभाजक, मध्यवर्ती भाग, पदपथ आणि सेवा रस्ते नियमितपणे स्वच्छ करणे, धुणे आणि त्यांची देखभाल केली जाईल. त्याचबरोबर, धुळीची समस्या कमी करण्यासाठी रस्ते वेळोवेळी धुतले जातील आणि मिस्टिंग यंत्राचा वापर करून पाण्याने फवारणी केली जाईल. दरम्यान, रस्त्यावरील अवरोध, रास्ता रोधकांचीही स्वच्छता करण्यात येणार आहे.

दत्तक रस्त्यांची निवड कोण करणार ?

दत्तक घेण्यासाठी प्रस्तावित रस्त्यांची यादी विभागीय सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकांद्वारे निवडली जाईल. तसेच, विभागीय सहाय्यक अभियंतांद्वारे पडताळली जाईल, जेणेकरून निवडलेल्या रस्त्यांना खरोखरच सखोल स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे व दर्शनीय परिणाम दिसतील, याची खात्री होईल. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील परिमंडळीय कार्यकारी अभियंत्याशी समन्वय साधून संबंधित विभागीय सहाय्यक आयुक्त अंतिम यादी मंजूर करतील.

दंडात्मक कारवाई

रस्त्यांवर नागरिकांकडून स्वच्छता केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास सुधारित घनकचरा व्यवस्थापन उपविधी, २०२५ च्या तरतुदींनुसार दंड वसूल करण्यासाठी आणि दंड आकारण्याचे अधिकार कनिष्ठ पर्यवेक्षकांना देण्यात येतील. कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या कामगिरीच्या आधारावर, त्यांना स्थळ पर्यवेक्षण, माहिती अहवाल आणि देखरेखीसाठी बाईक व टॅबलेट सारख्या अतिरिक्त सुविधा देण्याचा पालिकेचा मानस आहे.