मुंबई : मुंबईत वस्ती पातळीवर सुमारे २ हजार ३०० सार्वजनिक शौचालये आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत ही शौचालये अपुरी असल्यामुळे महानगरपालिकेने आणखी शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे. येत्या काळात १ हजार ६०० शौचालयांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे.समावेशक आणि शाश्वत समुदाय स्वच्छतेसाठी ‘समुदाय आधारित संस्था प्रणाली’ सक्षमीकरण या विषयावर भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वस्ती पातळीवरील संस्थांना प्रशिक्षित व सक्षम बनवणे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

वस्ती पातळीवरील शौचालयांची देखभाल दुरुस्ती महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत वस्ती पातळीवर संस्थांच्या सहभागातून केली जाते. या संस्थांसह लोकसहभागदेखील वाढणे आवश्यक आहे. प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण वापरकर्त्याचीही या संस्थांएवढीच जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या जाणीवेतूनच स्वच्छता राखली जाईल. या सर्व एकत्रित प्रयत्नातूनच मुंबईतील सार्वजनिक शौचालये ही देशात सर्वात स्वच्छ शौचालये म्हणून ओळखली जातील, असे मत महानगरपालिका उपायुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केले. स्थानिक रहिवाशांनी वस्ती पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण व स्वच्छतेसाठी परिसरातील शौचालयांच्या स्वच्छतेकरीत पुढाकार घ्यावा, असे आवाहन दिघावकर यांनी कार्यक्रमात केले

त्यावेळी ‘अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थे’च्या वरिष्ठ कार्यकारी संचालक उत्कर्षा कवडी, युनिसेफ महाराष्ट्रचे पर्यावरण व आपत्ती निवारण समन्वयक युसूफ कबीर, हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे शासन उपक्रमांचे व्यवस्थापक संदीप शेठ, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या स्वच्छ भारत अभियानाचे (नागरी) संचालक नवनाथ वाठ आदी यावेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छतेबाबत सविस्तर चर्चा

या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विविध सामाजिक संस्थांनी संगणकीय सादरीकरणातून स्वच्छतेचे महत्त्व आणि वस्ती पातळीवरील संस्थांच्या सक्षमीकरणासाठीच्या उपाययोजनांची, संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रत्यक्षात सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि दुरूस्ती करत असलेल्या विविध वस्ती पातळीवरील संस्थांनी यशोगाथा सादर केल्या. तसेच, गट चर्चेच्या माध्यमातून वस्ती पातळीवरील संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वच्छतेबाबत सविस्तर चर्चा केली.