मुंबई : पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदांना प्रतिसाद आला असून पुढील आठवड्यात कंत्राटदारांना कार्यादेश दिले जाणार आहेत. यंदा मुंबईतील सात परिमंडळातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एकूण ७९ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. कंत्राटदारांनी वीस ते पंचवीस टक्के कमी दराने बोली लावल्यामुळे यंदा खड्डे भरणीचा खर्च आणखी कमी होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत खड्डे भरणीचा खर्च ५५ ते ६० टक्के कमी होणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होत असते. डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण खूप असते. काँक्रिटच्या रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. त्यामुळे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांंपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले जात आहे. मुंबईत आतापर्यंत १२०० किमीपेक्षा अधिक रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. सध्या मुंबईत एकाच वेळी ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. सुरुवात केलेल्या रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. ज्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत, त्या रस्त्यावरील खड्डे भरण्याची जबाबदारी त्या त्या कंत्राटदाराची असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालिकेला सुमारे दीडशे किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डेच भरायचे आहेत. रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे जसजशी पूर्ण होत आहेत तसतसा खड्डे भरणीचा खर्च आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यंदा पालिकेने खड्डे भरण्यासाठी निविदा मागवल्या तेव्हा परिमंडळनिहाय निविदांनुसार खड्डे बुजवण्यासाठी ७९ कोटी रुपये अंदाजित खर्च ग्राह्य धरण्यात आला होता. गेल्यावर्षी १५५ कोटी रुपये खर्च खड्डे भरण्यासाठी झाला होता. यात यावेळी अंदाजित खर्चात सुमारे ५१ टक्के कपात करण्यात आली होती. तर आता पुढे आलेल्या कंत्राटदारांनी आणखी २० ते २५ टक्के कमी दराने बोली लावली असल्यामुळे यंदा प्रत्यक्षात खड्डे भरणीचा खर्च आणखी कमी होईल व पुढच्या वर्षी तो आणखी कमी होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.
खड्डे भरण्याच्या कामासाठी ९ मीटरपेक्षा जास्त रुंद रस्ते, ६ ते ९ मीटर रुंदीचे रस्ते आणि ६ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते, तसेच सिमेंट कॉंक्रीटीकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूच्या डांबरी पट्ट्या, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि द्रुतगती मार्गालगतचे सेवा रस्ते यांच्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पालिका प्रशासन करते.
खड्डे कमी होणार का ?
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने रस्ते कॉंक्रीटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. मात्र या कॉंक्रीटीकरणामुळे खड्डे कमी झाले का याचे उत्तर येत्या पावसाळ्यातच मिळू शकणार आहे. गेल्यावर्षी तब्बल १६ हजाराहून अधिक खड्डे बुजवण्यात आले होते व त्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. यंदा हा खर्च कमी झाला तरी खड्ड्यांची संख्या खरच कमी होणार का ते पावसाळ्यातच समजू शकेल.
दरम्यान, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि सेवा रस्ते यावरील खड्डे बुजवण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याकरीता निविदा मागवल्या असून कंत्राटदाराने सांगितलेले दर आणखी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठीचेही कंत्राटदार पुढील आठवड्यात निश्चित केले जाणार आहेत.
पूर्व उपनगरासाठी पुनर्निविदा
मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर या भागासाठी मागवलेल्या निविदांना दोन निविदाकारांनी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी एक कंत्राटदार बाद झाला. त्यामुळे या भागासाठी पुनर्निविदा काढण्यात येणार आहेत. या भागातील खड्डे बुजवण्यासाठी सहा कोटी २९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.