मुंबई : मुंबई महानगरपालिका हद्दीत शालेय शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांची दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी चाचणी घेण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणात पहिली ते दुसरी इयत्तेतच मुलांना लिहिता-वाचता आल्यास स्वयंअध्ययनाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, तसेच त्यांची शैक्षणिक कारकीर्द उज्ज्वल होईल, या उद्देशाने केंद्र सरकारच्या निपुण अभियानाअंतर्गत महापालिकेच्या शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का करण्याचा संकल्प सोडला आहे.

हेही वाचा – Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया, डॉक्टर म्हणाले; “आम्ही…”

महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांचे लेखन, वाचन व गणितीय कौशल्य विकसित करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी चाचणी घेण्याचे नियोजन केले आहे. येत्या शनिवारपासून (१८ जानेवारी ) पालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन येत्या शैक्षणिक वर्षात गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ५ जुलै २०२१ रोजी निपुण भारत अभियानाला सुरुवात केली. प्राथमिक वयोगटातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता विकसित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याच अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत महिन्यातून एकदा चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षकांनीही कंबर कसली आहे. येत्या शनिवारी सर्व शाळांमध्ये पहिली चाचणी घेतली जाणार असलयाने विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेणे, त्यांना अडलेले प्रश्न सोडविणे, सातत्याने सराव आदींमध्ये शिक्षक गुंतले आहेत. बहुपर्यायी प्रश्नसंच पद्धतीवर आधारित या चाचणीत विद्यार्थ्यांना एका तासात ५० प्रश्न सोडवावे लागणार आहेत. मुक्तांगण संस्थेने या चाचणीसाठी प्रश्नपत्रिका तयार केली असून महापालिकेच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून तपासणी झाल्यांनतर प्रश्न निश्चित करण्यात आले आहे. एकूण ८ भाषांमध्ये प्रश्नपत्रिका भाषांतरित केली आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ च्या जुलैपासून इयत्ता पहिली व तिसरीचाही या उपक्रमात समावेश केला जाणार आहे.

विद्यार्थी – पालकांमध्ये कुठलाही ताणतणाव निर्माण न करता खेळीमेळीच्या वातावरणात उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. या चाचणीतून इयत्ता दुसरीतील सुमारे ३० ते ३५ हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जाईल. ज्यातून विद्यार्थ्यांमधील कमतरता, त्यांची बलस्थाने, सुधारणेसाठी आवश्यक उपाययोजना, विविध माध्यमांची स्थिती आदी विविध बाबी लक्षात येतील. त्यानुसार नव्या शैक्षणिक वर्षात उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”

विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता विकसित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उपक्रम राबविण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षकांना तीन महिने प्रशिक्षण

पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान उपक्रमाचे ४ टप्पे असून पूर्व प्राथमिकपासून तिसरीपर्यंतच्या वर्गातील मुलांना लिहिण्या – वाचण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी मदत केली जाणार आहे. सध्या पालिकेने इयत्ता दुसरीवर लक्ष केंद्रित केले असले तरी २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीतील विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेतल्या जातील. तसेच, जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर कसा सुधारावा, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.