मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या पुस्तकांचा संच देण्यात येणार असून चालू आर्थिक वर्षात शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला होता. मात्र शैक्षणिक वर्ष संपत आले असताना या पुस्तकांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता ही पुस्तके पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत पडून राहणार आहेत. साधारण ४० हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तके घेण्यात आली आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या १०४८ प्राथमिक तसेच १४७ माध्यमिक अशा एकूण ११९५ शाळा मुंबईत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलुगू आणि कन्नड अशा आठ विविध माध्यमांतून या शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महापालिका विविध २७ शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा करीत असते. तसेच अवांतर वाचनासाठी पुस्तके, नियतकालिके, ई पुस्तके, डिजिटल पुस्तके पुरवत असते. अभ्यासक्रमासाठी पूरक असते अध्ययन व अध्यापन साहित्यही उपलब्ध करून दिले जाते. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत शिक्षण विभागाने घोषणा केली होती. विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य व अस्खलित संभाषणाकरीता व्याकरणाची गरज लक्षात घेऊन माध्यमनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय भाषेच्या व्याकरणाच्या पुस्तकांचा संच देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षात व्याकरणाच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी २ कोटी ७६ लाखांची तरतूद करण्यात आली होती.

हेही वाचा – मुंबई : भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात उभारणार नवीन सर्पालय, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी

व्याकरणाची पुस्तके खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र पुरवठादारांकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर तीन निविदाकार आल्यानंतर त्यातून एकाची निवड करण्यात आली आहे. व्याकरणाच्या पुस्तकांची खरेदी करण्याकरीता पालिका प्रशासनाने २०२३ मधील विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरली असून त्यानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत शिक्षण विभागाच्या उपायुक्त प्राची जांभेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही पुस्तके पुढील शैक्षणिक वर्षासाठी आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होताच ही पुस्तके उपलब्ध होणार आहेत. मिशन मेरीट या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रथमच ही पुस्तके दिली जाणार आहेत. पालिकेच्या शाळेतील दहावीच्या मुलांचा निकाल चांगला लागावा याकरीता आमचा प्रयत्न आहे, असेही जांंभेकर यांनी सांगितले.

हेही वाचा – कांदिवली – दहिसरमध्ये महापालिकेतर्फे पाच हजार झाडांचे रोपण, वृक्षारोपणात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

सर्व माध्यमांचे नववीचे एकूण विद्यार्थी – २३,५८२

पुस्तकांचा खर्च – १ कोटी ३६ लाख ४७ हजार ८७० रुपये

सर्व माध्यमांचे दहावीचे एकूण विद्यार्थी – १७,८४०

पुस्तकांचा खर्च – १ कोटी २३ लाख ४४ हजार ५०० रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंत्राटदाराने दिलेला एकूण दर – २ कोटी ५९ लाख ९२ हजार ३७० रुपये