मुंबई : घराघरातून, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेला सांडपाणी पुनःप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र अद्ययावत करण्याचे काम वेगात सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समुद्रात सोडले जाणारे सांडपाणी हे इतके स्वच्छ असेल की २०३० पर्यंत मुंबईचा समुद्र काळा दिसणार नाही, तर तो स्वच्छ होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
घराघरातून आणि कारखान्यातून उत्सर्जित होणारे सांडपाणी व मलजलाचे व्यवस्थापन महापालिकेतर्फे करण्यात येते. सव्वाकोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत दररोज साधारणत: दोनशे ते अडीचशे कोटी लीटर सांडपाण्याची निर्मिती होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या पाण्यावर महानगरपालिकेच्या उदंचन केंद्रात प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेले सांडपाणी समुद्र, नदी किंवा खाडीत सोडले जाते. समुद्रात सोडले जाणारे पाणी अधिक चांगल्या दर्जाचे असावे याकरीता महानगरपालिकेने ‘मुंबई मलनिःसारण प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत अंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सात ठिकाणी असलेल्या व्यवस्थेची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. त्याकरीता या सात केंद्राच्या ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत. हे सातही प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सातपैकी वरळी आणि वांद्रे येथील मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्प स्थळास प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) राजेश ताम्हाणे, उप प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे यांच्यासह संबंधित अधिकारी/ अभियंते उपस्थित होते.
२०५१ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार
या सांडपाणी प्रकल्पाची क्षमता ही २०५१ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात किती प्रमाणात सांडपाणी निर्मिती होईल त्यावर प्रक्रिया करण्याकरीता ही सातही केंद्रे सक्षम आहेत, अशी माहिती उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली.
स्वच्छ केलेले सांडपाणी भविष्यात विकत देणार
आतापर्यंत समुद्रात सोडल्या जाणाऱ्या या पाण्यावर तृतीय स्तरावरची प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरले जाणार आहे. उद्याने, बांधकाम, विकासकाम, तसेच विविध कंपन्यांसाठी हे पाणी वापरले जाणार आहे. हे पाणी देण्याकरीता प्रकल्पाच्या ठिकाणी टॅंकर भरण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच भांडवली खर्चाच्या प्रमाणानुसार या पाण्याचे दर ठरवले जातील. हे दर पिण्याच्या पाण्याच्या दरापेक्षा कमी असतील, अशी माहिती अशोक मेंगडे यांनी दिली.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये…
सांडपाणी प्रक्रिया केंद्र | क्षमता |
वरळी | ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन |
वांद्रे | ३६० दशलक्ष लिटर प्रतिदिन |
मालाड | ४५४ दशलक्ष लिटर |
घाटकोपर | ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन |
धारावी | ४१८ दशलक्ष लिटर प्रतिदिन |
भांडुप | २१५ दशलक्ष लिटर प्रतिदिन |
वर्सोवा | १८० दशलक्ष लिटर प्रतिदिन |
एकूण | २४६४ दक्षलक्ष लिटर |