मुंबई : सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीरपणे सोडून दिलेल्या बेवारस, तसेच निकामी, भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही महानगरपालिकेने सुरू केली आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात १२ ऑगस्टपर्यंत एकूण ४ हजार ३२५ बेवारस वाहने आढळली आहेत. त्यापैकी ३ हजार १५३ वाहनमालकांना महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे, तर १ हजार ९२७ बेवारस, तसेच निकामी / भंगार वाहने ‘टोईंग’ करून कंत्राटदाराच्या यार्डमध्ये नेण्यात आली आहेत.
मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे रस्ते मिळावेत यासाठी महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस, तसेच निकामी, भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्याचे धोरण निश्चित केले आहे. याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दीर्घकाळ दूरवस्थेत पडून असलेल्या बेवारस वाहनांची ओळख पटवून, नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने बाह्य संस्थांची नेमणूक केली आहे.
त्यात शहर विभागासाठी मेसर्स आयएफएसओ टेक्नॉलॉजी प्रा. लि., पूर्व उपनगरांसाठी मेसर्स रझा स्टील आणि पश्चिम उपनगरांसाठी मेसर्स प्रदीप ट्रेडिंग कंपनी या कंत्राटदारांचा समावेश आहे. या कंत्राटदारांमार्फत नियमित आणि नियमाधीन कारवाई सुरू आहे. दंडात्मक कारवाई करण्यासह रस्त्यांवरील अडगळ दूर करणे, हा यामागील हेतू आहे.
त्यानुसार शहर विभागात एकूण ८३३ बेवारस वाहने आढळली असून, त्यापैकी ५०२ वाहनमालकांना महानगरपालिका अधिनियम, १८८८ (अद्ययावत) मधील कलम ३१४ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १४७ वाहने ‘टोईंग’ करण्यात आली आहेत. पूर्व उपनगरांत एकूण १ हजार ४४० बेवारस वाहने आढळली असून त्यापैकी १ हजार १३० वाहनमालकांवर कलम ३१४ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच त्यातील ७४० वाहनांचे ‘टोईंग’ करण्यात आली आहेत. पश्चिम उपनगरांत एकूण २ हजार ५२ बेवारस वाहने आढळली असून त्यापैकी १ हजार ५२१ वाहनमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर १ हजार ४० बेवारस तसेच निकामी, भंगार वाहने ‘टोईंग’ करून कंत्राटदाराच्या यार्डमध्ये नेण्यात आली आहेत.
अन्यथा वाहन ‘टोईंग‘ करणार
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (अद्ययावत) मधील कलम ३१४ अन्वये बेवारस वाहनावर नोटीस बजावली जाते. वाहनमालकाने नोटीस बजावल्यानंतर ७२ तासांच्या आत वाहन सार्वजनिक रस्त्यावरून हटवले नाही, तर ते वाहन ‘टोईंग’ करून कंत्राटदाराच्या यार्डमध्ये नेले जाते. तसेच, ३० दिवसांनंतर या वाहनाची विल्हेवाट लावली जाते व त्याबाबत कुठलाही दावा करता येत नाही. त्यामुळे ‘टोईंग’ करून यार्डमध्ये जमा केलेले वाहन परत हवे असल्यास, वाहनमालकांनी ३० दिवसांच्या आत देय दंडाची रक्कम भरणे बंधनकारक आहे.
‘ या’ मोबाइल क्रमांकावर तक्रारीची सुविधा
महानगरपालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यामार्फत बेवारस वाहनांवर नियमितपणे कारवाई सुरू आहे. मुंबईकरांनी सार्वजनिक रस्त्यावर दीर्घकाळ बेवारस पडून असलेली वाहने आढळल्यास शहर विभाग : व्हॉट्स ॲप क्रमांक ७५०५१२३४५६ , पूर्व उपनगरे : व्हॉट्स ॲप क्रमांक ९८१९५४३०९२ आणि पश्चिम उपनगरे : व्हॉट्स ॲप क्रमांक ८८२८८९६९०३ वर संपर्क साधावा. व्हॉट्स ॲप क्रमांकावर वाहनाचे छायाचित्र व गुगल लोकेशनसह तक्रार नोंदवावी. तसेच, १९१६ क्रमांकावर किंवा महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.