मुंबई : मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महानगरपालिका प्रशासन पेलवत आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कचराभूमीपर्यंत नेण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने नुकतेच अंधेरी येथे सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या या केंद्रात दररोज १० दशलक्ष टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या जटिल होत आहे. पुरेशा कचरापेट्यांअभावी अनेक भागात रस्त्यांवरच कचऱ्याचे ढीग साचत असून झोपडपट्टी परिसरात ही समस्या आणखी गंभीर बनली आहे. या कचऱ्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावताना पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील विविध भागांमधून संकलित केला जाणारा कचरा विविध ठिकाणच्या कचराभूमीवर प्रक्रिया करण्यासाठी वाहून नेला जातो. सध्यस्थितीत कचराभूमीतील कचऱ्याचे प्रमाणही वाढत असून मुंबईत दररोज ६५०० मेट्रिक टनाहून अधिक कचरा जमा होतो. मुळात या कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने त्यावर प्रक्रिया करताना महापालिकेला विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण झाल्यास त्याचे प्रमाण कमी होईल आणि त्यावर प्रक्रिया करणे सोयीस्कर होईल. ही बाब लक्षात घेऊन कचऱ्याचा भार हलका करण्याच्या उद्देशाने अंधेरी येथील महाकाली गुंफा मार्गावर सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. हिंदुस्थान यूनिलिव्हर, झिंटीयो आणि दालमिया पॉलिप्रो लिमिटेड यांच्यासोबत सार्वजनिक – खासगी भागिदारी तत्वावर या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी दररोज १० दशलक्ष टन कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यात येणार आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोटे यांच्या हस्ते या केंद्राचे बुधवारी उद््घाटन करण्यात आला. के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला, हिंदुस्थान यूनिलिव्हर, झिंटीयो आणि दालमिया पॉलिप्रो लिमिटेडचे प्रतिनिधी यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मोटे यांनी केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून हरित पर्यावरणाचा संदेश दिला. तसेच, युवा स्वयंसेवक व उपस्थितांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.