मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग कार्यालयांमधील रद्दी कागदांच्या विक्रीतून महानगरपालिकेला थोडेथोडके नाही तर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७० लाख रुपये मिळणार आहे. येत्या दोन वर्षांतील अंदाजित दोन लाख किलो रद्दीच्या विक्रीतून ही रक्कम महानगरपालिकेला मिळणार आहे. महानगरपालिकेने अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा जास्त मोबदला या रद्दीतून मिळणार आहे. रद्दीच्या विक्रीतून २२ लाख रुपये मिळतील, असा महानगरपालिकेला अंदाज होता. मात्र रद्दी विक्रीतून ७० लाख रुपये मिळणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबई: रिक्षा-टॅक्सींमधील मीटर बदल कासवगतीने; चालक-मालकांमध्ये उदासीनता
महानगरपालिकेतील रद्दी कागदांची विक्री करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. गेल्या चार वर्षांतील रद्दीच्या विक्रीतून जितकी रक्कम मिळाली त्यात प्रतिवर्षी दहा टक्के वाढ करून त्याच्या आधारे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने अंदाजपत्रक तयार केले होते. दोन वर्षांत सुमारे दोन लाख किलो रद्दी विकून २२ लाख रुपयांच्या आसपास रक्कम मिळेल असा महानगरपालिकेला अंदाज होता. मात्र निविदाकारांनी या निविदेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक प्रकारच्या रद्दीसाठी वाढीव दराने भाव मिळणार आहे. महानगरपालिकेच्या संबंधित खात्याने या सर्व रद्दी कागदांसाठीचे दर १० ते १५ रुपये किलो गृहित धरले होते. मात्र निविदाकारांनी या रद्दीला ३० ते ३५ रुपये किलो दर देऊ केले आहेत.
जुनी पावती पुस्तके, जुना अभिलेख – १,६८,९२९ किलो
जुनी वर्तमानपत्रे साप्ताहिके, पाक्षिके यांची रद्दी – २,५६७ किलो
मनपा मुद्रणालयातील कात्रणे, गुंडाळलेले रद्दी कागद – २३,००१ किलो
कचऱ्याच्या टोपलीतील कागद – ५०० किलो
महानगरपालिकेच्या शाळांमधील जुन्या वापरलेल्या उत्तरपत्रिका – ५०० किलो
खात्यांच्या पावतीपुस्तकांची कार्डबोर्डसची कव्हरे – ५०० किलो
बिस्किट बॉक्सचे पुठ्ठ्याचे खोके – ९,६५६ किलो
पूर्वमुद्रीत लेखनसामुग्रीची रद्दी – ५०० किलो
एकूण – २,०६,१५३ किलो