scorecardresearch

मुंबई: रिक्षा-टॅक्सींमधील मीटर बदल कासवगतीने; चालक-मालकांमध्ये उदासीनता

मुंबई विभागातील ४३ हजार ३१ काळ्या – पिवळ्या टॅक्सींपैकी १६ हजार ४३६ टॅक्सींच्या मीटरमध्ये नव्या भाडेदरानुसार बदल करण्यात आले आहेत

मुंबई: रिक्षा-टॅक्सींमधील मीटर बदल कासवगतीने; चालक-मालकांमध्ये उदासीनता
फोटो सौजन्य : लोकसत्ता संग्रहित छायचित्र

मुंबई : नवीन भाडेदर लागू केल्यानंतर परिवहन विभागाने रिक्षा-टॅक्सी चालकाना काळ्या – पिवळ्या रिक्षा – टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल (रिकॅलिब्रेशन) करण्यासाठी १५ जानेवारी २०२३ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. मात्र त्यानंतरही मीटरमधील बदलासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांमधील उदासीनता आणि संथ गतीने सुरू असलेली प्रकिया यामुळे आतापर्यंत मुंबई विभागात केवळ ३८ टक्के टॅक्सी आणि सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक रिक्षांमध्ये मीटर बदल झाले आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: परेलपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका: चार-पाच महिन्यात भूसंपादन पूर्ण होणार; शीव उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी परवानगीची प्रतीक्षा

मुंबई विभागातील ४३ हजार ३१ काळ्या – पिवळ्या टॅक्सींपैकी १६ हजार ४३६ टॅक्सींच्या मीटरमध्ये नव्या भाडेदरानुसार बदल करण्यात आले आहेत. तर मुंबईतील अंधेरी आरटीओअंतर्गत ५६ हजार ०९ रिक्षापैकी ३८ हजार ६१९, वडाळा आरटीओअंतर्गत ८२ हजार ३६८ पैकी ४२ हजार १४, बोरिवली आरटीओच्या अखत्यारीतील ६१ हजार ०८ पैकी ३४ हजार १४२ आणि ठाणे आरटीओतील ८५ हजार ४८५ रिक्षांपैकी २२ हजार ३६४ रिक्षांच्या मीटरमध्ये बदल करण्यात आले आहेत. मीटर बदल वेळेत करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला होता. मीटरमध्ये बदल न करणाऱ्यांचा परवाना एक दिवसासाठी निलंबित आणि पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: गिरणी कामगारांप्रमाणे `बेस्टʼ कामगारांनाही मालकीची घरे हवीत!

भाडेवाढीच्या निर्णयानंतर नवीन मीटर उपलब्ध करण्यासाठी लागलेला कालावधी आणि अन्य कारणांमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांना मीटर बदल करण्यासाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत होती. या मागणीनुसार परिवहन विभागाने मीटर बदलासाठी १५ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली. मात्र त्यानंतरही मीटर बदल संथ गतीने होत आहे. त्यामुळे काही चालक अद्यापही आरटीओकडून प्राप्त भाडेतक्त्याच्या आधारे प्रवाशांकडून भाडे घेत आहेत. तर काही चालक तक्ता नसतानाही प्रवाशांकडून नव्या दरानुसार भाडे घेत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 17:43 IST

संबंधित बातम्या