मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुंबईतील मोठ्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुरू करण्यात आली होती. पण, मुंबई महानगर पालिकेच्यानिवडणुकीत शहरातील रहिवाशी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
शहरांमधील मतदानाचा टक्का घटत चालल्याच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि उच्चभ्रू मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी मागील विधानसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ५५३ मतदान केंद्रे तर मुंबई शहर जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १०० केंद्रे सुरू करण्यात आली होती. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी याचा उपयोग झाला होता.
आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र ठेवू नका, अशी शिफारस राज्य निवडणूक आयुक्तांकडून मुंबई महानगर पालिका आयुक्तांना करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र ठेवल्यास सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप होण्याचा धोका आहे. उमेदवार स्थानिक असल्यामुळे ओळख आणि समान हितसंबंध असणाऱ्या लोकांकडून मतदारांना प्रभावित केले जाऊ शकते. त्यामुळे महापालिका निवडणुका पारदर्शक होण्यासाठी सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे ठेवू नका, अशी सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला केली आहे. पण, सोसायट्यांबाहेरील शाळा, महानगर पालिकेच्या किंवा अन्य सरकारी इमारती, अस्थापनांमध्ये मतदान केंद्रे सुरू करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
अनियमितात टाळण्यासाठी खबरदारी
महापालिका निवडणुकीत उमेदवार स्थानिक असतात. त्यामुळे ओळख आणि समान हितसंबंधी व्यक्ती आणि गटांकडून सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील मतदान केंद्रांमध्ये अनियमितात होण्याची शक्यता लक्ष्यात घेऊन मुंबई पालिका प्रशासनाला सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
