अनिश पाटील

मुंबई : नाशिक आणि सोलापूर येथील मेफ्रेडॉनचे (एमडी) कारखाने काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत पाच हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एमडी जप्त केले आहे. या कारवायांमध्ये नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येकी एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने उद्धवस्त करण्यात आले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी कारवाई आहे.

अमली पदार्थ निर्मिती, पुरवठय़ाचे प्रकरण सध्या राज्यभर गाजते आहे. सातत्याने विविध भागांमध्ये अमली पदार्थ सापडल्याची चर्चाही होत असते. मात्र मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत अमली पदार्थाविरोधात केलेल्या कारवाया महत्त्वाच्या समजण्यात येत आहेत. या कालावधीत मुंबई पोलिसांनी दोन हजार ६३५ किलो एमडी जप्त केले असून त्याची किंमत पाच हजार २४३ कोटी ६७ लाख रुपये आहे. नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येक एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने अशा एकूण ६ कारखान्यांवर छापे टाकून ते सील करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या दोन वर्षांमध्ये एमडी तस्करी व विक्रीबाबत ४९५ गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांमध्ये ७१८ आरोपींना अटक केली आहे. २०१८ मध्ये मुंबई पोलिसांनी १० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. २०१९ मध्ये तीन कोटी, २०२० मध्ये पाच कोटी २१ लाख, २०२१ मध्ये ३२ कोटी २९ लाख रुपये किमतीचा एमडी जप्त केले आहे.

हेही वाचा >>>ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाची हौस ; सहा महिन्यांत एक कोटी ४६ लाख लाभार्थी

गैरसमजांचे बळी

अमली पदार्थाच्या विक्रीसाठी विक्रेते हे तरुणांना या पदार्थाचे खोटे फायदे सांगतात. त्याला बळी पडून अनेकजण या व्यसनाला बळी पडतात. मेफ्रेडॉनमुळे(एमडी) ‘झिरो फिगर’साठी उपयुक्त आहे. यापासून ऊर्जा मिळते, असा अपप्रचार आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व तासंतास नृत्यासाठी बारबाला सध्या मोठय़ा प्रमाणात एमडीचा वापर करत आहेत.  सध्या ५० टक्क्यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

एमडीमुळे झोप येत नाही, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करू शकता. एमडीमुळे त्वचा सतेज राहते, महाविद्यालयातील तरुणांना या जाळय़ात ओढण्यासाठी सांगण्यात येते. या भूलथापांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी बळी पडतात. चार-पाच वेळा एमडी घेतल्यानंतर या तरुणांना याचे व्यसन लागते. त्यानंतर विक्रेते त्यांनाही या व्यवसायात गुंतवतात.  त्यामुळे मुंबई पोलिसांनी एमडीविरोधात विशेष कारवाया  केल्या आहेत. यामध्ये मोठय़ा प्रमाणात एमडी जप्त केले आहे. 

२०२३ मध्ये ३७१ कोटींचा  साठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलिसांनी यावर्षी ३७१ कोटी रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहे. १८५ किलो एमडी, ५८० किलो गांजा, २८ किलो चरस, एक किलो ७७४ ग्रॅम चरस, १५ किलो केटामाईन, कोडेन या खोकल्याच्या १५ हजार ५०० बाटल्या, एलएसडीचे ५२२ डॉट, नायट्राझेपम ३६ हजार २४३ गोळय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई १८ ऑक्टोबपर्यंत अंमलीपदार्थाचे ११८९ गुन्हे दाखल झाले असून त्यात १४६५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.