मुंबईः पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवार रात्री शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले. या कारवाईत मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत १९२ ठिकाणांवर शोध मोहिम राबवण्यात आली. यावेळी शहरात नाकाबंदीदरम्यान ७२३५ वाहनांची तपासणी करण्यात आली.पहलगाम हल्ल्यानंतर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबवले.

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व ५ प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व १३ परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. प्रत्येक पोलीस ठाण्यातून जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.

अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती, हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखान्यांची तपासणी करण्यात आली. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, अमलीपदार्थ, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू शोधण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली व शोधमोहिम राबवण्यात आली. या प्रत्येक कामासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.

फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे, प्रलंबित अजामीनपात्र वारंट आणि स्थायी वॉरंट बजावणे, अवैध दारू, जुगार अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलीस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या मोहमेत हाती घेण्यात आली होती.

ऑलआउट अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

– मुंबई पोलीसांच्या अभिलेखावरील तसेच फरार १० आरोपींना अटक करण्यात आले आहे.- ३० जणांवर अजामीनपात्र वॉरंटसंदर्भात कारवाई करण्यात आली.

– अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणा-या, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकूण १९ जणांवर कारवाई करून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली..

– मुंबई शहराबाहेर हद्दपार केलेले, परंतु मुंबई शहरात ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान विना परवाना प्रवेश केलेल्या एकूण ४० तडीपार आरोपींवर मपोका. कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली

– महाराष्ट्र (मुंबई ) पोलीस कायदयाचे कलम १२० व १२२ अन्वये संशयितरित्या वावरणारे एकूण ६४ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.-मुंबई शहरात एकूण १९२ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील अनेक आरोपी तपासण्यात आले .- सर्व पोलीस ठाण्यांच्या हददीत एकूण १११ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

– त्यात एकूण ७२३५ दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.- मोटारवाहन कायदयान्वये १८३६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– कलम १८५ मो.वा.का. अन्वये ६३ मध्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.